‘एमयोगा’ ऍपद्वारे घरबसल्या शिकता येणार योगासने

0
112

>> जागतिक योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऍप लॉंच; तीन भाषांमध्ये उपलब्ध

जगभरात काल जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. सातव्या जागतिक योगदिनानिमित्त संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच मोदींनी ‘एमयोगा’ हे ऍप लॉंच केले. या ऍपमध्ये योगासनांविषयी माहिती आणि योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जगभरातील नागरिकांना घरबसल्या योगासने शिकता येणार आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या या संकटात योग लोकांसाठी वरदान ठरत असल्याचे नमूद केले. या ऍपद्वारे ‘वन वर्ल्ड, वन हेल्थ’ उद्देश पूर्ण होण्यास मदत मिळेल, असेही मोदी म्हणाले.

आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने मिळून एमयोगा ऍप बनवले आहे. १२ ते ६५ वर्षादरम्यानच्या व्यक्तींना या ऍपच्या माध्यमातून दररोज योग प्रशिक्षण घेता येईल. तसेच, हे ऍप युजर्सचा कोणताही खासगी डेटा देखील जमा करत नाही. एमयोगा ऍप सध्या हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत उपलब्ध आहे व लवकरच इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध केले जाणार आहे. दरम्यान, यावर्षीची योगदिनाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ ही आहे.

ऍप संपूर्ण जगासाठी उपयोगी : पंतप्रधान
भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त सहकार्यातून एम योगा ऍप तयार करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन विज्ञानच्या संगमातून निर्माण होणारे एम योगा ऍप हे शानदार उदाहरण आहे. ते केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी उपयोगी पडेल, अशा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

एमयोगा ऍपची वैशिष्ट्ये
एमयोगा ऍप पूर्णपणे सुरक्षित आहे
यूजरच्या मोबाईलमधून कोणतीही माहिती ऍप गोळा करत नाही.
१२ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या ऍपचा दररोज वापर करू शकतात.
या ऍपमध्ये योगासने कशी करावीत, याबाबत साध्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली जाईल.
या ऍपमध्ये योगासनांसंबंधी व्हिडिओ प्रसिद्ध केले जातील. ते जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील.