कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी चोडणकरच; तर कार्याध्यक्षपदी आलेक्स सिल्वेरा

0
44

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने काल विविध समित्यांची स्थापना केली असून, गिरीश चोडणकर यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवले आहे, तर आलेक्स सिल्वेरा यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. तसेच पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी दिगंबर कामत यांनाच कायम ठेवले आहे.

प्रदेश कॉंग्रेस समितीच्या निवडणूक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी लुईझिन फालेरो, तर निमंत्रकपदी एम. के. शेख यांची निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभेसाठी कॉंग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची, तर सहअध्यक्षपदी संगीता परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश कॉंग्रेस समितीच्या वित्त समिती अध्यक्षपदी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्क सार्दिन यांची, तर सहअध्यक्षपदी डॉ. प्रमोद साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा अध्यक्षपदी ऍड्. रमाकांत खलप यांची, तर सहअध्यक्षपदी एल्विस गोम्स यांची वर्णी लागली आहे. प्रसिद्धी समिती अध्यक्षपदी चंद्रकांत चोडणकर, तर सहअध्यक्षपदी मार्था साल्ढाणा यांची निवड करण्यात आली आहे.