लसीचे दोन्ही डोस घ्या; अन् गोव्यात या

0
46

>> लसीकृत व्यक्तींसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राची अट मागे; उच्च न्यायालयाचा पर्यटकांसह परराज्यांतील नागरिकांना दिलासा

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास पर्यटकांसह परराज्यांतील नागरिकांना आता गोव्यात थेट प्रवेश करणे शक्य होणार आहे. काल याविषयक दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना राज्यात प्रवेश देण्यास राज्य सरकारला परवानगी दिली. संपूर्ण लसीकृत व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

राज्य सरकारने गेल्या जुलै महिन्यत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर केलेल्या एका याचिकेद्वारे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या परराज्यांतील लोकांना गोवा प्रवेशास परवानगी द्यावी आणि त्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करू नये, अशी मागणी याचिकेतून केली होती.

सध्या फक्त राज्याबाहेर गेलेले गोमंतकीय आणि कामानिमित्त गोव्यात प्रवेश करणार्‍या संपूर्ण लसीकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येत होता. पर्यटक व अन्य परप्रांतीयांना मात्र कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने काल दिलेल्या निवाड्यामुळे आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांना व इतरांनाही कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रशिवाय राज्यात प्रवेश करता येणार आहे.
या संदर्भात सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर तज्ज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या परराज्यातील नागरिक व पर्यटकांना आरटीपीसीआर किंवा रॅपिट अँटिजेन चाचणीशिवाय गोव्यात प्रवेश देण्यास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला परवानगी दिली.
यापूर्वी या संदर्भात १२ जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त राज्यात प्रवेश करणारे परप्रांतीय, तसेच राज्याबाहेर गेलेल्या गोमंतकीयांकडे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना राज्यात प्रवेश द्यावा, असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र पर्यटकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रातून सूट दिलेली नव्हती.

गोव्यातही झाला होता
डेल्टा प्लसचा शिरकाव

कोरोना विषाणूचे आतापर्यंतचे सर्वात धोकादायक असे उत्परिवर्तीत रूप असलेल्या डेल्टा प्लसचा संसर्ग राज्यातील एका रुग्णाला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे.

गोमेकॉने राज्यातील काही रुग्णांच्या तपासणीचे नमुने गेल्या जुलै महिन्यात जिनोम सिक्वेसिंगसाठी पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स प्रयोगशाळेत पाठवले होते, त्यापैकी एकाला धोकादायक अशा डेल्टा प्लसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण यापूर्वीच गृहविलगीकरणातील उपचारानंतर कोरोनामुक्त झाला आहे.
पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अन्य नमुन्यांपैकी दोघा जणांना डेल्टाचा संसर्ग, सहा जणांना कप्पाचा संसर्ग, तर सात जणांना डेल्टाच्या उपवंशाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.