कॉंग्रेस आणि जादूगार

0
23

कॉंग्रेस पक्षाला सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती समजावणार्‍या राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांना पक्षाचे सल्लागार न राहता पक्षनेतृत्व स्वीकारण्याची गळ कॉंग्रेस पक्षाने घातली आहे. यापूर्वीही प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये सामील होण्याच्या वाटेवर होते, मात्र, काही मुद्‌द्यांवर सहमती न झाल्याने त्यांचा कॉंग्रेस प्रवेश तेव्हा लांबणीवर पडला होता. निवडणुका जिंकून देण्यात प्रशांत किशोर यांचा हातखंडा असल्याने त्यांना एकदा पक्षात घेतले की मग विजयच विजय असे कदाचित कॉंग्रेसच्या मंडळींना वाटत असेल. देशावर दीर्घकाळ सत्ता चालवणार्‍या एका जुन्या, अनुभवी राजकीय पक्षावर अशा प्रकारे भाडोत्री नेतृत्वाची वेळ यावी याला काय म्हणावे? प्रशांत किशोर यांच्या आयपॅकने आजवर अनेक राजकीय पक्षांना निवडणुका जिंकून दिल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तर नरेंद्र मोदी यांच्या प्रचारमोहिमेचे सुकाणू त्यांनी हाती धरले होते. त्यानंतर कधी ममता बॅनर्जी, कधी स्टालीन, कधी जगन्मोहन रेड्डी, कधी के चंद्रशेखर राव अशा विविध प्रादेशिक नेत्यांना निवडणुकांमध्ये मदत करण्यासाठी ते पुढे सरसावले. मध्यंतरी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी त्यांना आपल्या पक्षाला प्रादेशिक पक्षापासून राष्ट्रीय पक्षात रुपांतरित करण्यासाठी मदत करण्याची गळ घातली आणि पाच वर्षांचा रीतसर करारही केला. पश्‍चिम बंगालची विधानसभा निवडणूक किशोर यांनी त्यांना जिंकूनही दिली. मात्र, पाच राज्यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकांत गोव्यात प्रशांत किशोरांच्या रणनीतीची कशी धूळधाण उडाली हे आपल्यासमोर आहेच! गोव्यात आपले आडाखे कामी येणार नाहीत हे दिसताच अर्ध्या निवडणुकीत त्यांनी अंग काढून घेत नामानिराळे झाले होते.
खरे तर यापूर्वी कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांची आघाडी बनविण्याच्या प्रयत्नांतही प्रशांत किशोर सामील झालेले होते. शरद पवार यांच्याशी त्यांची झालेली भेट, यशवंत सिन्हांच्या राष्ट्रमंचच्या बैठकीतील त्यांची उपस्थिती आणि कॉंग्रेसेतर आघाडी भाजपला आव्हान देऊ शकते यासारखी त्यांची विधाने तिसर्‍या आघाडीचे सूत्रधार म्हणून ते कामाला लागले असल्याचे सूचित करीत होती. तेव्हा कॉंग्रेसवरही त्यांनी नाना दुगाण्या झाडल्या होत्या. कॉंग्रेसने आपला अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडावा, कँडल मार्च आणि ट्वीटरद्वारे भाजपला हरवता येणार नाही असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला होता. कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी तेव्हा प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तरही दिले होते. कॉंग्रेसचा गेल्या दहा वर्षांतील नव्वद टक्के निवडणुकांत पराभव झाला आहे, कॉंग्रेसने जिंकलेली शेवटची सार्वत्रिक निवडणूक १९८४ मधील होती वगैरे त्यांची विधाने कॉंग्रेसच्या जखमांवर मीठ चोळणारी होती. भाजप पुढील अनेक दशके देशाच्या राजकारणातील मोठी शक्ती बनून राहणार असल्याचेही भाकीत त्यांनी केलेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ते कॉंग्रेसच्या गोटात शिरताना दिसत आहेत.
कॉंग्रेसला त्यांनी जो पुढील रोडमॅप आखून दिला आहे त्यात पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रित करावे, पक्षाच्या संपर्क विभागाची समूळ पुनर्रचना करावी, उत्तर प्रदेश, बिहार, उडिशासारख्या राज्यांत पक्षाने स्वबळावर लढावे, तर महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्‍चिम बंगालमध्ये आघाडी करावी वगैरे वगैरे सूचनांचा समावेश आहे. परंतु पक्षात नेतृत्वबदलाची गरज आहे हे सांगायलाही ते विसरलेले नाहीत. कॉंग्रेसच्या सार्‍या दुखण्याचे मूळ तर तेच आहे. गांधी घराण्याचे नेतृत्व झुगारले तर कॉंग्रेस एकसंध उरणार नाही आणि नेतृत्व करायला गांधी घराण्यात सोनियांनंतर कोणी पात्र नाही अशा परिस्थितीत कॉंग्रेसची धूळधाण उडत चालली आहे. अशा वेळी प्रशांत किशोर पक्षात येऊन निवडणुकांमागून निवडणुका जिंकून देतील असे जर कोणाला वाटत असेल तर ते हास्यास्पद ठरेल. प्रशांत किशोरांसारखे राजकीय चाणक्य केवळ वाट दाखवू शकतात. त्या वाटेवरून चालायची धमक तर पक्षनेतृत्वाला दाखवावी लागणार आहे. त्यासाठी मुळात सक्षम केंद्रीय नेतृत्व हवे आहे आणि तिथेच तर राहुल – प्रियांकाच्या मर्यादा उघड्या पडलेल्या आहेत. कॉंग्रेसपुढील आव्हान फार मोठे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत पक्षाने पंजाबसारखे मोठे राज्य गमावले. इतर राज्यांत पानीपत झाले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी प्रशांत किशोर निव्वळ सल्लागाराच्या भूमिकेत न राहता पक्षनेतृत्व स्वीकारणार असतील तर त्यातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जरूर वाढेल, परंतु त्यांच्या हाती काही जादूची कांडी नाही की छूऽ मंतर म्हणावे आणि कॉंग्रेसची सारी दुखणी दूर व्हावीत!