Home Featured कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

0

कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने त्यांची ही प्रत्यक्ष भेट महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे ह्या बाबतीत कॉंग्रेसवर आघाडी घेत आपली निवडणूक व्यूहरचनाही केली आहे. त्यामुळे त्यापाठोपाठ राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणवणारा, परंतु गेल्या निवडणुकीत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनूनही विधिमंडळातले आपले अर्ध्याहून अधिक बळ गमावून बसलेला कॉंग्रेस पक्ष पुन्हा एकवार निकराने आपली विस्कळीत मांडणी सुरळीत करण्यासाठी धडपडू लागला आहे ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. गुंडुराव यांनी गोव्यात येण्यापूर्वी आभासी पद्धतीने पक्षपदाधिकार्‍यांशी संवाद साधला त्यामध्ये पक्षाच्या झेंड्याखालील सेवादल, महिला कॉंग्रेस, एनएसयूआय आदी संघटनांना १५ जुलैपूर्वी पुनर्रचना करण्यास फर्मावले. खरे तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना ह्या संघटनांची पुनर्रचना कशी काय होऊ शकेल? मुळात गुंडुराव यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचे काय करणार हे आधी स्पष्ट करायला हवे.
गिरीश चोडणकर यांनी पदाचा राजीनामा द्यायचा आणि गुंडुराव यांनी तो नाकारायचा हा खेळ आजवर अनेकदा चालला, मात्र, आता खरोखर चोडणकर यांचे पद जायची वेळ आल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे तेव्हा मात्र त्यांचे समर्थक म्हणजे मुख्यतः कॉंग्रेसमधील तरुणतुर्क मंडळी चोडणकरांना हटवू नका अशी मागणी रेटण्यासाठी संघटित झालेली दिसत आहे. म्हणजे मुख्यत्वे पक्षातील जुन्या धंेंडांना त्यांनी दिलेला हा इशारा आहे. तुम्ही पक्षाचे नेते म्हणवता, पक्षाच्या वतीने सत्ता उपभोगता, पण कधी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत नाही, सरकारशी संघर्ष करीत नाही हा राग ह्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन व्यक्त केलेला आहे. ऐन निवडणूक जवळ येऊन ठेपली असता तरुण आणि बुजुर्ग नेत्यांमधील ही दुफळी गुंडुराव कशी सांधणार आहेत?
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी केवळ विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तेवढे गेल्या काही काळापासून अत्यंत सक्रिय झाल्याचे दिसत आहे. भाजप सरकारवर जोरदार दैनंदिन हल्लाबोल त्यांनी चालवला आहे, परंतु पक्षाच्या विधिमंडळ गटातील इतर मंडळी मात्र आपण जणू त्या गावचेच नसल्यागत अजूनही शांतपणे बसलेली दिसते. त्यामुळे पक्षाच्या तरुण नेत्यांचा त्याविषयीचा असंतोष अनाठायी नक्कीच नाही. फक्त निवडणुकीसाठी एकदिलाने एकत्र येण्याची ही वेळ असताना पक्षामध्ये अशा प्रकारची अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू होणे हे अंतिमतः मारकच ठरेल. लुईझिन फालेरो यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचे दिल्लीहून जवळजवळ निश्‍चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला जोरदार विरोध होऊ लागला आहे. दुसरीकडे माजी कायदामंत्री रमाकांत खलपही केव्हापासून आपल्या राजकीय पुनर्स्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु सध्याच्या पक्षसंघटनेवरील गिरीश चोडणकर ह्यांचा प्रभाव निर्विवाद आहे व जरी त्यांना निवडणुकीत यश मिळू शकलेले नसले तरी पक्षाच्या विद्यमान संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि कोणीही सरकारविरुद्ध तोंड उघडायला तयार नव्हते अशा काळात सरकारशी आमनेसामने येऊन दोन हात करण्याचे त्यांनी दाखवलेले धाडस दुर्लक्षिता येणार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा हा वाद अधिक रेंगाळत न ठेवता गुंडुराव यांना प्रामुख्याने आणि प्राधान्याने सोडवावा लागेल. ऐन निवडणूक काळात प्रदेशाध्यक्ष बदलून संघटनेमध्ये विसंवाद आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे योग्य ठरेल का ह्याचा विचारही त्यांनी केला पाहिजे. ही वेळ अंतर्गत धुसफुशीला चालना देण्याची नसून मूठमाती देण्याची आहे.
राज्यातील भाजप सरकारला गोत्यात आणू शकतील असे अनेक मुद्दे समोर आहेत. खाण, म्हादई सारखे प्रश्न सोडवण्यातील वा कोरोना हाताळणीतील अपयश असो वा केंद्रातील भाजप सरकारमुळे उडालेला लसीकरणाचा फज्जा, वाढती महागाई, इंधनाचे गगनाला भिडणारे दर असोत, जनतेला साद घालू शकणारे अनेक मुद्दे आ वासून उभे आहेत. जनतेपुढे ते कसे मांडले जातात हे महत्त्वाचे ठरणार आहे. गोवा फॉरवर्ड, मगो आदींशी हातमिळवणी न करता स्वबळावर लढण्याची खुमखुमी अजूनही कॉंग्रेसला आहे का हेही पाहावे लागेल. गेल्या वेळी दिग्विजयसिंगांनी स्वबळाच्या बाता मारल्या होत्या, परंतु अखेरीस हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गमवावा लागला होता. कॉंग्रेसला येत्या निवडणुकीची आपली रणनीती वास्तवाचे भान राखून आखावी लागणार आहे. येथे सामना भाजपसारख्या शिस्तबद्ध आणि शक्तिशाली पक्षाशी आहे हे शेवटी विसरून चालणारे नाही.