नवीन शैक्षणिक वर्षाचा सोमवारपासून प्रारंभ

0
50

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण

येत्या सोमवार दि. २१ जूनपासून शैक्षणिक वर्षाचा आरंभ होत असून कोविडच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने बोलताना स्पष्ट केले.

दि. २१ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असले तरी कोविड महामारीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता त्यांचे ऑनलाइन पद्धतीनेच वर्ग भरवण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यासंबंधी काल बोलताना शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत म्हणाले की, २१ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असले तरी शाळांमध्ये वर्ग भरणार नाहीत. मुलांना सध्या तरी ऑनलाइन पद्धतीनेच शिकवण्यात येणार आहे. आम्ही फक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना तेवढे शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

अभ्यासक्रमात यंदाही कपात
२०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच यंदाही २०२१-२२ ह्या शैक्षणिक वर्षीही दहावी व बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात कपात केली जाणार आहे. कोरोनाचा प्रकोप, मागील परीक्षा पुढे ढकलल्यामुळे झालेला उशीर, आगामी विधानसभा निवडणुका आदींमुळे यंदाही दहावी व बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने सर्व शिक्षण संस्थांना कळवले आहे.

अभ्यासक्रमात ३० टक्के कपात

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात कपात कायम राहणार आहे. गतवर्षी दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात साधारण ३० टक्के कपात करण्यात आली होती. कोरोना महामारी, परीक्षा पुढे ढकलण्याची आलेली वेळ आणि आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन अभ्यासक्रमात कपात कायम राहील, असे मंडळाने म्हटले आहे.