कॉंग्रेसचा घोळात घोळ

0
33

गेली जवळजवळ दोन वर्षे आगामी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या गर्जना करीत आलेला कॉंग्रेस पक्ष आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याइतपत नरमलेला दिसतो. मात्र, ‘समविचारी’ च्या त्यांच्या व्याख्येमध्ये एकेकाळी कॉंग्रेसपासूनच फुटून निघून बनलेला तृणमूल कॉंग्रेस येत नाही. मात्र, गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युतीसंदर्भात विचार होऊ शकतो असे संकेत पक्ष प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी नुकत्याच आपल्या गोवा भेटीत दिले. वास्तविक, जवळजवळ दोन महिन्यांपूर्वी गोवा फॉरवर्डने कॉंग्रेसशी युतीबाबत आग्रह धरला असताना आधी त्यांच्याशी चर्चेचे गुर्‍हाळ घालून नंतर कॉंग्रेसने पाठ फिरवली होती. परंतु आता कॉंग्रेसला त्यासंदर्भात उपरती झालेली दिसते. त्यामुळे गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याच्या विचारापर्यंत कॉंग्रेस पक्ष येऊन ठेपला आहे. मात्र, अद्यापही त्यांची बोलणी ‘प्राथमिक’ स्तरावरच अडलेली आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजपला सत्तेवरून खाली खेचणे हे आमचे लक्ष्य आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणात या ना त्या कारणाने खो घालत आणि स्वतःचे अहंकार कुरवाळत कॉंग्रेस पक्ष कालापव्यय करीत चालला आहे.
कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि गोव्यात तो अनेक वर्षे सत्तेत होता व आज प्रमुख विरोधी पक्ष आहे या अहंकारामध्ये कॉंग्रेस नेतृत्व अजूनही दिसते. प्रत्यक्षात गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भरघोस कौल देऊनही सत्ता स्थापू न शकलेल्या कॉंग्रेसची कशी वाताहत उडाली, दहा पक्षी एका रात्रीत कसे पळाले हे वास्तव गोमंतकीय जनतेसमोर आहेच. उरलेल्या मंडळींपैकी कोण दुटप्पी भूमिकेत आहे, कोण दुसर्‍या पक्षात उडी घेण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहे हेही जनता जाणते. मात्र, सद्यस्थितीत सत्ताधारी भाजपामध्ये स्वार्थ साधला जाणार नाही असे दिसताच काही सत्ताधारी आमदार कॉंग्रेसला जवळ करण्याचा विचार करताना, किंबहुना तसे भासवताना दिसत असल्याने कॉंग्रेसचा आत्मविश्वास आणि अहंकार पुन्हा अस्मानी पोहोचलेला दिसतो.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस पक्षाने जोरदार कंबर कसली आहे. हे दोन्ही पक्ष अर्थातच कॉंग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला खिंडार पाडून आपले बस्तान बसवण्याच्या इराद्याने गोव्यात अवतरलेले आहेत. दोन्हीही पक्षांनी कॉंग्रेसमधून छोटे – मोठे मासे आजवर गळाला लावले आहेत. आपच्या आसर्‍याला गेलेल्या प्रतिमा कुतिन्हो असोत किंवा तृणमूलच्या गोटात डेरेदाखल झालेले लुईझिन फालेरो असोत, कॉंग्रेसची मंडळी आपसातील लाथाळ्यांमुळेच एकीकडे पक्षत्याग करून चालती झाली. मात्र, दुसरीकडे भाजपमधील असंतुष्ट कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची हवा निर्माण करून आपले आणि आपल्या परिजनांचे तिकीट सुनिश्‍चित करण्यात गुंतले आहेत. कळंगुटचे वाचाळ आमदार मायकल लोबो सतत आपण कसे किंगमेकर आहोत आणि आपल्याला विविध राजकीय पक्षांकडून कशी मोठी मागणी आहे हेच भाजपा श्रेष्ठींवर ठसविण्याच्या धडपडीत दिसतात. कॉंग्रेस त्यांना खरोखरीच जवळ करण्याचा धोका पत्करणार का? निवडणुकीनंतर हेच मायकल पुन्हा घाऊक पक्षी घेऊन पुन्हा भाजपाच्या सत्तेच्या पदराआड धाव घेणार नाहीत कशावरून? पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार नाही अशी गर्जना कॉंग्रेस पक्ष सतत करीत असतो. परंतु भाजपमधील अशा बंडखोरांचे जिंकून येणे दुरापास्त दिसत असल्याने त्यांची तिकिटे कापली जाण्याची संभाव्यता असल्याने ही मंडळी पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतण्याची आस बाळगून राहिली आहेत असेही कॉंग्रेसचे नेते सांगत आहेत.
कॉंग्रेस पक्ष जर स्वतःला राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणवत असेल, तर इतर छोट्यामोठ्या भाजपविरोधी पक्षांना सोबत घेऊन एक बळकट आघाडी बनवून सत्तेत येण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही समविचारी प्रादेशिक पक्षांना युती हवी असेल तर त्यांनी प्रस्ताव द्यावेत असे म्हणत वेळकाढूपणा चालला आहे. २०१७ ची निवडणूक कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवली होती. तेव्हाही गोवा फॉरवर्डला शेवटपर्यंत झुलवत फटकारले होते. परंतु निवडणुकीत गोवा फॉरवर्डने चमकदार कामगिरी करून दाखवली. परंतु तरीही त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणे पक्षाला जमले नाही. कॉंग्रेसच्या या कर्मदरिद्रीपणाला पक्षनेत्यांचा अहंकार आणि स्वार्थच कारणीभूत होता आणि आता युतीचा घोळ घालून जो वेळकाढूपणा चालला आहे, त्यामागेही दुसरे काही कारण दिसत नाही. केंद्रीय स्तरावरील निर्नायकी स्थितीबाबत तर न बोललेलेच बरे! कॉंग्रेसचा घोळात घोळ काही संपता संपेना असेच दिसते आहे.