कॉंग्रेसकडून जनतेची दिशाभूल ः शाहनवाझ हुसेन

0
96

नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्यावरून कॉंग्रेस पक्ष देशातील लोकांची दिशाभूल करून त्यांना भडकावत असल्याचा आरोप काल भाजपचे प्रवक्ते व माजी केंद्रीय मंत्री शहनवाज हुसेन यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. वरील कायद्यात कुणाचे नागरिकत्त्व हिसकावून घेण्यासाठी दुरूस्ती करण्यात आलेली नसून बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशातील ज्या अल्पसंख्यांकांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागते अशा अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्त्व बहाल करण्यासाठी हा कायदा करण्यात आला असल्याचे हुसेन म्हणाले.

भारतातील मुस्लिम सुरक्षित
भारतात २० कोटी मुसलमान असून वरील कायद्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. सबका साथ और विकास हे मोदी सरकारचे घोषवाक्य असून मोदी सरकार मुसलमानांना देशाबाहेर काढील अशी अफवा कॉंग्रेस पक्ष पसरवत असून त्यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन हुसेन यानी यावेळी केले. भारत स्वतंत्र झाल्यापासून जे मुसलमान भारतात राहत आहेत ते भारताचे नागरिक असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे हुसेन यांनी सांगितले.

६०० मुसलमानांना
यापूर्वीच भारतीय नागरिकत्त्व
मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून यापूर्वीच सुमारे ६०० मुसलमानांना भारतीय नागरिकत्त्व दिले असल्याचेही हुसेन यानी यावेळी सांगितले. केंद्र सरकारने तयार केलेला हा कायदा सर्व राज्यांना लागू होत असून पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह दोन-तीन राज्यांनी आपण हा कायदा लागू करणार नसल्याचे म्हटले असले तरी संसदेने संमत केलेला हा कायदा सर्वच राज्यानंा लागू करावा लागणार असल्याचे हुसेन यांनी स्पष्ट केले.

घुसखोरांना नागरिकत्त्व नाही
बंगलादेशी नागरिकांसह जे जे नागरिक घुसखोरी करून भारतात आलेले आहेत अशा लोकांना नागरिकत्त्व देण्यात येणार नसल्याचे हुसेन यांनी यावेळी स्पष्ट केले.