नागरिकत्व कायदा त्वरित मागे घ्या

0
184

>> पणजीतील जाहीर सभेत मागणी

येथील आझाद मैदानावर आयोजित एका जाहीर सभेत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीला विरोध करण्यात आला असून नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती त्वरित मागे घेण्याची मागणी काल केली.
माजी आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर यांनी आयोजित या नागरिकांच्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत होते. या सभेला राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींंनी उपस्थिती लावली होती.
नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती भारतीय घटनेच्या विरोधात आहे. देशातील नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करणारे देशद्रोही आहेत, असा आरोप निमंत्रक अरविंद भाटीकर यांनी केला.

देशातील सत्ताधारी भाजप देशाचे धर्माच्या नावावर विभाजन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशासाठी मुस्लीम बांधवांनीसुध्दा योगदान दिलेले आहे. याचा विसर पडला आहे, अशी टीका एम. के. शेख यांनी केली.
नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती लोकविरोधी आणि भारतीय घटनेच्या विरोधात आहे. सीएए आणि एनआरसी कुणालाच नको आहे, असा दावा आसिफ हुसेन यांनी केला.
देशात महागाई, बेकारीसारखे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपने नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केली आहे, असा दावा वाल्मिकी नाईक यांनी केला.

देशातील कुठलाही कायदा धर्माच्या नावावर संमत करण्यात आलेला नाही. परंतु, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून लोकांत धर्माच्या नावावर फूट घालण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केली.
भाजपच्या गोव्यातील अल्पसंख्याक समाजातील मंत्री आणि आमदारांनी केंद्राने संमत केलेल्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीबाबत भूमिका जाहीर करावी, अशी जाहीर मागणी संदेश प्रभुदेसाई यांनी केली. यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो, वाल्टर लोबो, रसिका मुजावर, प्रकाश कामत व इतरांनी विचार मांडले. सूत्रसंचालन राहुल म्हांबरे यांनी केले.