लागूंच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

0
100

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज गुरुवारऐवजी उद्या शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी काढले. दरम्यान, लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत ठेवले जाणार आहे. लागू निरीश्वरवादी होते. त्यामुळे धार्मिक विधी होणार नाहीत, असे लागू यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. डॉ. लागू यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. लागू यांचे चिरंजीव आनंद अमेरिकेत आहेत. ते आल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील,’ असे लागू कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आनंद गुरुवारपर्यंत पुण्यात पोहोचू शकत नसल्याने लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम आणि कन्या डॉ. शुभांगी कानिटकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. लागू यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.