केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन

0
10

>> अनुकुल वातावरण नसल्याने गोव्यात पाऊस उशिरा

हवामान विभागाने मोसमी पाऊस सामान्य तारखेपेक्षा तीन दिवस अगोदर केरळमध्ये दाखल झाल्याचे काल जाहीर केले आहे. मात्र येत्या ३ ते ४ दिवसात अनुकूल वातावरणाच्या अभावामुळे मोसमी पाऊस गोव्यात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. कर्नाटकातील काही भागात मोसमी पाऊस पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

केरळमध्ये १ जूनला मोसमी पाऊस दाखल होतो. यावर्षी तीन दिवस अगोदर २९ मे २०२२ रोजी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अरबी समुद्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने मोसमी पावसाची आगेकूच सुरू झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

केरळ राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्याची सामान्य तारीख १ जून आहे. तथापि, मागील दहा वर्षातील मोसमी पावसाचा आढावा घेतल्यास केवळ दोन वेळा १ जूनला मोसमी पाऊस सुरू झाला आहे. तीन वेळा सामान्य तारखेच्या पूर्वी आणि पाच वेळा सामान्य तारखेनंतर मोसमी पाऊस सुरू झाला आहे. २०१८ आणि २०२२ मध्ये २९ मे रोजी मोसमी पाऊस सुरू झाला. २०१७ मध्ये ३० मे, २०१३ आणि २०२० मध्ये १ जूनला मोसमी पाऊस सुरू झाला. तर, २०१४ मध्ये ६ जून, २०१५ मध्ये ५ जून, २०१६ मध्ये ८ जून २०१९ मध्ये ८ जून आणि २०२१ मध्ये ३ जूनला मोसमी पाऊस सुरू झाला.

केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर साधारण चार पाच दिवसांनी गोव्यात मोसमी पाऊस दाखल होतो. गोव्यातील काही भागात येत्या पाच दिवसात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या १ जूनपासून पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील चोवीस तासात म्हापसा आणि काणकोण येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.