नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्य विमानाचे अवशेष सापडले

0
13

नेपाळहून निघालेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले. या विमानात चार भारतीयांसह एकूण २२ प्रवासी होते. तारा एअरचे हे विमान काल रविवारी सकाळी डोंगराळ भागात येणार्‍या मस्तंग जिल्ह्यात बेपत्ता झाले होते. त्यानंतर या विमानाचे अवशेष कोवांग गावात सापडल्याची माहिती नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रमुखांनी अवशेष सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावरील सद्यःस्थितीची माहिती घेण्यात आल्यानंतर तेथे मदतकार्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

स्थानिकांच्या माध्यमातून नेपाळी सैन्याला या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळाली. तारा एअरच्या विमानाला भूस्खलनामुळे लामचे नदी परिसरात हा अपघात झाला. नेपाळचे सैन्य जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचले असून तपास केला जात आहे. तारा एअरचे हे विमान सर्वात शेवटी मस्तंग जिल्ह्यात दिसल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
बेपत्ता झालेल्या आणि आता अवशेष सापडलेल्या विमानात एकूण २२ प्रवासी होते. पैकी ४ जण भारतीय असून ते सगळे मुंबईचे आहेत. विमानात १३ नेपाळी, २ जर्मन, ४ भारतीय नागरिक आणि ३ कर्मचारी होते. ४ भारतीय मुंबईचे रहिवासी आहेत. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी त्यांची नावे आहेत.