राज्यपालपद मिळणे ही अभिमानास्पद बाब ः आर्लेकर

0
74

(हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झालेले भाजप नेते राजेंद्र आर्लेकर यांची आमचे प्रतिनिधी बबन भगत यांनी घेतलेली मुलाखत.)

प्रश्‍न : हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी आपणांवर सोपवण्यात आलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? – हिमाचल प्रदेशसारख्या एका राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी राष्ट्रपतींनी माझ्याकडे सोपवली आहे याचा अभिमान आहे. राज्यपालपद हे खरंच एक मोठे पद आहे. हे पद साधेसुधे नसून ते एक घटनात्मक पद आहे. राज्य सरकार व्यवस्थितपणे काम करते की नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यपालांवर असते.

प्रश्‍न : राज्यपालपदाची माळ गळ्यात पडेल याची पूर्वकल्पना होती? – पूर्वकल्पना मुळीच नव्हती. फक्त गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून तशी कल्पना दिली होती. आणि लवकरच तो पदभार स्वीकारण्यासाठी तयार राहण्याची सूचना केली होती. आणि त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे काल मंगळवारी सकाळी राष्ट्रपती भवनमधून फोन आला आणि माझी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे कळले.

प्रश्‍न : राष्ट्रपतींच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या? – राज्यपालपद हे फार मोठे पद आहे. खूप मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. हा विचार मनाला शिवून गेला. हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद स्वीकारल्यानंतर कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे हे तेथे जाऊन पदभार स्वीकारल्यानंतरच कळू शकेल.

प्रश्‍न : राज्यपालपदावर नियुक्ती झालेली गोव्यातील आतापर्यंतची आपण केवळ तिसरी व्यक्ती आहात. याबद्दल काय सांगाल? – आतापर्यंत ज्या दोघा गोमंतकीयांची राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे ते गोव्याबाहेर राहूनच राज्यपाल पदापर्यंत पोचले. संपूर्ण आयुष्यभर गोव्यातच राहून त्या पदावर पोचणारा मी पहिलाच गोमंतकीय आहे.

प्रश्‍न : सध्या विविध राज्यात पक्षांतराच्या घटना वाढू लागलेल्या आहेत त्याविषयी काय सांगाल? – पक्षांतराच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यघटनेत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टात पक्षांतर बंदी कायदा आहे.

प्रश्‍न : भाजपचा एक छोटा कार्यकर्ता ते आता मिळालेले राज्यपालपद याविषयी काय सांगाल? भाजपमध्ये राहून खूप काही शिकता आले. आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या पदावर पोचू शकलो, एवढेच मी म्हणेन.