केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल

0
106

>> ४३ मंत्र्यांचा शपथविधी तर १२ मंत्र्यांचा डच्चू

>> मनसुख मांडवीय आरोग्यमंत्री तर अश्‍विनी वैष्णव रेल्वेमंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल बुधवारी विस्तार झाला. यावेळी १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यावेळी खातेवाटपात मोठे बदल केल्याचे दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तर अमित शहांकडे गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. पीयुष गोयल यांच्याकडील रेल्वे मंत्रीपद काढून ते अश्‍विनी वैष्णव यांना देण्यात आले आहे. तर मनसुख मांडवीय यांनी आरोग्यमंत्री करण्यात आले आहे. पीयुष गोयल यांच्याकडील वाणिज्य मंत्रालय कायम ठेवण्यात आले असून वस्त्रोद्योग आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रीपदासह माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क या खात्याचीही जबाबदारी सोपवली आहे.

मनसुख मांडवीय यांना आरोग्यमंत्र्यासोबतच खते आणि रसायन मंत्रीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. हरदीप सिंग पुरी यांना आरोग्य मंत्रालय आणि नगरविकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अनुराग ठाकूर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग मंत्रालय सोपवले असून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झाले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल बुधवारी दिल्लीत विस्तार करण्यात आला. राष्ट्रपती भवनात ४३ मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. तर ७ विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. राष्ट्रपती भवनातील दरबार सभागृहामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली. शपथ घेतलेल्यांमध्ये १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

१५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांना शपथ
काल १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्रप्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपतीकुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीपसिंग पुरी, मुकेश मांडवीय यांच्यासह एकूण १५ कॅबिनेट तर पंकज चौधरी, अनुप्रियासिंह पटेल, सत्यपालसिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदजले, भानुप्रतापसिंह वर्मा, यांच्यासह २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

शिवसैनिक ते केंद्रीय
मंत्री नारायण राणे
खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले असून श्री. राणे यांनी काल केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. नारायण राणे यांना मोदी सरकारने पहिल्या रांगेत स्थान दिले. राणे यांनी हिंदी भाषेतून मंत्रीपदाची शपथ घेतली. राणे ६ वेळा आमदार राहिले आहेत. नारायण राणे यांचा कट्टर शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास झाला आहे.

श्रीपाद नाईक यांच्या खात्यात बदल
केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय आयुषमंत्री असलेल्या गोव्याच्या श्रीपाद नाईक यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे असलेले केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्य मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे पर्यटन राज्यमंत्रीपद तसेच पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बारा मंत्र्यांचे राजीनामे
पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट विस्तारापूर्वी एकूण १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यात दिग्गज मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी शिफारस केलेल्या मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये डी. व्ही. सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संतोषकुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देबश्री चौधरी या मंत्र्यांचा समावेश आहे.