कोविडने निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला २ लाखांचा सानुग्रह निधी

0
133

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

ज्या कुटुंबांतील व्यक्तींचे कोविडने निधन झालेले आहे अशा कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रु. चा सानुग्रह निधी देण्याच्या निर्णयाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ज्या कुटुंबांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रु. पर्यंत आहे अशाच कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

त्याशिवाय कोविड महामारीमुळे आर्थिक झळ बसलेल्या राज्यातील पारंपरिक व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून एकरकमी ५ हजार रु. देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मोटारसायकल पायलट, रिक्षाचालक, फुलविक्रेते, भाजी विक्रेते, रेदेंर, खाजेकार, मनरेगा कामगार आदी सुमारे पारंपरिक व्यवसाय करणार्‍या २५ ते ३० हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

ग्रामीण भागांत मोबाईल टॉवर्स
बसवण्यासाठी कंपन्यांना सवलत

राज्यातील खेडेगावात मोबाईल टॉवर्स बसवणार्‍या कंपन्यांकडून वार्षिक ५० हजार रु. एवढ्या भाड्याऐवजी पुढील पाच वर्षे फक्त ५ हजार रु. एवढे भाडे वसूल केले जाईल. पाच वर्षांनंतर त्यांच्याकडून २५ हजार रु. भाडे वसूल केले जाईल. कुठल्या गावात मोबाईल टॉवर्सचा अभाव आहे त्याची पाहणी केली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यावर जी नैसर्गिक आपत्ती कोसळली त्यावेळी प्रशासनाला जो खर्च करावा लागला त्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत पूर्वलक्षी मंजुरी देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.