अलविदा

0
236

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा दिलीपकुमार नावाचा अखेरचा शिलेदार काल आपल्यातून निघून गेला. मात्र, गेल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीतून निर्माण झालेले चोखंदळ चित्रपटरसिकांच्या नवनव्या पिढ्यांवरील त्यांचे गारुड काही संपणार नाही. दिलीपकुमार नावाचा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक महानायक तुमच्या – आमच्या मनात केव्हाच अजरामर झालेला आहे. ह्या महानायकाचे वर्णन त्यांच्या नंतरच्या पिढीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘‘चित्रपटसृष्टीच्या एकूण प्रवासाची विभागणी ‘दिलीपकुमार यांच्यापूर्वी’ आणि ‘दिलीपकुमार यांच्यानंतर’ अशीच करावी लागेल’’ अशा अत्यंत सार्थ वाक्यात केले आहे. दिलीपकुमार यांनी खरोखरीच चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या नैसर्गिक, सहजसुंदर अभिनयाने एक नवे परिवर्तन आणले. त्यांच्या आधीच्या पिढीतील चित्रपट अभिनेत्यांना सवय होती ती रंगभूमीची. त्यामुळे रंगभूमीप्रमाणेच चित्रपटांमधूनही इंग्रजीत ज्याला ‘लाउड ऍक्टिंग’ संबोधले जाते, तसा बराचसा अतिरेकी स्वरुपाचा वाटू शकणारा अतिशय नाट्यपूर्ण अभिनय, सतत चढ्या आवाजातील संवादफेक हा त्यांचा स्थायीभाव बनून गेलेला होता. तो दोष होता असे नव्हे, परंतु तो त्या काळाचा प्रभाव होता. चंदेरी दुनियेत नशीब आजमावण्यासाठी पेशावरहून मुंबईत आलेल्या युसूफ पठाण ऊर्फ दिलीपकुमार या तरण्याबांड अभिनेत्याने ही पारंपरिक अभिनयशैली पडद्यावरून पुसूनच टाकली आणि आपल्या अत्यंत नैसर्गिक, सहजसुंदर अभिनयातून आणि बर्‍याचशा अबोल, शांत धाटणीतील संवादफेकीतून कालसुसंगत अशी एक नवी वाट नव्या पिढीला खुली करून दिली. ह्या अभिनयशैलीला ‘मेथड ऍक्टिंग’ संबोधले गेले आणि तिची वाहवाही झाली. खरा अभिनय हा कधीच दिसता कामा नये, जाणवता कामा नये. दिलीपकुमार यांचा अभिनय हा अभिनय वाटत नाही. ती सहजता भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आणण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागते. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे ‘त्यांच्यापूर्वी’ आणि ‘त्यांच्यानंतर’ असे कालविभाजन अमिताभना करावेसे वाटते.
दिलीपकुमार यांच्या बर्‍याचशा सामाजिक आशयाच्या, गंभीर भूमिकांमुळे लोक त्यांच्यावर ‘ट्रॅजेडी किंग’ चा शिक्का मारतात. परंतु ते केवळ शोकांतिकांचे राजे नव्हते. ‘जुगनु’, ‘दीदार’, ‘देवदास’ सारख्या चित्रपटांमुळे त्यांच्यावर तो शिक्का जरूर बसला, परंतु ‘राम और श्याम’ मधल्या दुहेरी भूमिकेसारख्या विनोदी भूमिकाही त्यांच्या नावावर जरूर आहेत. दिलीपकुमार म्हटले की अनेक अजरामर चित्रपटांची मांदियाळी समोर दिसते. ‘मुगल ए आझम’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘मधुमती’ अशी ही नामावली वाढत जाते. पन्नास वर्षे सातत्याने चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचा आब आणि रुबाब टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रवासातील एका प्रदीर्घ युगावर दिलीपकुमार ही अक्षय्य नाममुद्रा उमटलेली आहे. काही व्यक्ती ह्या नुसत्या व्यक्ती नसतात. त्या जणू संस्था असतात. त्यांच्या कामातून ही संस्थात्मकता त्यांनी प्राप्त केलेली असते. दिलीपकुमार ही अशी एक चालतीबोलती ‘संस्था’ होती. तिच्याकडून नव्या पिढीला शिकण्यासारखे खूप काही होते आणि आहे. ५४ साली त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचे ‘फिल्मफेअर’ मिळाले होते. त्यानंतर आठवेळा त्यांच्याकडे ‘फिल्मफेअर’ चालत आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पुरस्कारांचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. पाकिस्तान ही जन्मभूमी असल्याने तेथील ‘निशान ए पाकिस्तान’हा सर्वोच्च सन्मान आणि भारत ही कर्मभूमी राहिल्याने ‘भारतरत्न’ प्राप्त करून त्यांनी कलाकाराला प्रांत, धर्म, भाषेच्या सीमा नसतात हेच जणू दाखवून दिले आहे. खरे तर कोणत्याही व्यापक क्षेत्रामध्ये आपले नाव कोरणे फार फार कठीण असते. चित्रपटसृष्टी ही तर अशी मायापुरी आहे जिथे एका रात्रीत सुपरस्टार घडतात आणि एकाच रात्रीत धुळीलाही मिळतात. नाना धर्मांचे, जातींचे, नाना भाषा बोलणारे, नाना प्रांतांची संस्कृती जोपासणारे प्रेक्षक समोर असल्याने त्या सर्वांना आपलेसे करणे हे तर महाकठीण काम. परंतु असे काही मोजकेच महानायक भारतीय चित्रपटसृष्टीत वेळोवेळी निर्माण झाले ज्यांनी ह्या सीमारेषा पुसून टाकल्या. दिलीपकुमार हे त्यातील एक अत्यंत ठसठशीत नाव! आता ते आपल्यात नाहीत. पुन्हा कधीच नसतील, परंतु त्यांचा तो पडद्यावरचा सहजसुंदर वावर, संवादफेकीपूर्वीची ती लक्षवेधी विलक्षण शांतता, ते काव्यात्म मौन कसे विसरता येईल? ‘विधाता’ मध्ये त्यांचा एक गाजलेला संवाद आहे. ‘‘कागजात पर दस्तखत मै हमेशा अपनी कलम से करता हूँ!’’ अभिनयही त्यांनी असाच आपल्या स्वतःच्या ‘कलम’नेच केला. अलविदा दिलीपसाब…!