अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही गटांना आपापली चिन्हे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून नव्याने चिन्हाचा शोध सुरू आहे. ठाकरे गट सध्या ३ चिन्हांवर विचार करत आहे. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या तीन चिन्हांचा पर्याय आहे. आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या तीन चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार आहे. आज मुंबईत होणार्या बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
शिंदे गटाकडूनही चिन्हांचा पर्याय
शिंदे गटानेही चिन्हांबाबत घेतलेल्या बैठकीत चिन्हांची चाचपणी केली. शिंदे गटाने तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य दिले आहे. आज सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत शिंदे गटही या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला १९७ निवडणूक चिन्हे शिल्लक असून या दोन्ही गटांना यापैकी तीन चिन्हांचा पर्याय दिला जाऊ शकतो. दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे आज ठरणार आहे. सध्याच्या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना आज सोमवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत चिन्हे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.