कॅसिनोंना परवानगी द्या

0
45

>> हॉटेल्स संघटनेचे अध्यक्ष गौरिश धोंड यांची मागणी

कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात असून, लसीकरणालाही वेग आलेला आहे. त्यामुळे पर्यटनाला गती देणे शक्य आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन कॅसिनो व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी गोवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्‌स संघटनेचे अध्यक्ष गौरिश धोंड यांनी केली आहे.

शिक्षण संस्था, कॅसिनो, मसाज पार्लर हे व्यवसाय सोडल्यास अन्य व्यवसाय सुरू झालेले असून, मद्यालयेही चालू झालेली आहेत. आता तर ५० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहेही सुरू झालेली आहेत. त्यामुळे पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू होणे आवश्यक असल्याचे मत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वाची कडक अंमलबजावणी करून कॅसिनो सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, असे धोंड यांनी म्हटले आहे. सरकारने आतापासूनच पर्यटनासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज आहे. कोणतीही गोष्ट दीर्घकाळ बंद राहिल्यास ती लगेच पूर्वपदावर येऊ शकत नाही. पर्यटनाचीही तीच गत होण्याची भीती असल्याने सरकारने आणखी विलंब करू नये, असेही धोंड यांनी म्हटले आहे.

राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. कोरोनामुळे अन्य व्यवसायानांही फटका बसला आहे. पर्यटन व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले कॅसिनो व हॉटेलसारखे अन्य व्यवसायही बंद आहेत. परिणामी बेरोजगारीत आणखी भर पडली आहे.

गौरिश धोंड,
अध्यक्ष, गोवा हॉटेल्स-रेस्टॉरंट्‌स संघटना.