कुठ्ठाळी ग्रामसभेत प्रचंड गदारोळ >> एकास अटक, नदीच्या राष्ट्रीयीकरणाचा विषय गाजला

0
118

कुठ्ठाळीच्या ग्रामसभेत नदीच्या राष्ट्रीयीकरणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला व अखेर ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब करण्यात आली. यावेळी अपशब्द वापरल्याप्रकरणी तसेच ग्रामसभेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रायन गोम्स याला वेर्णा पोलिसांनी अटक केली.

यावेळी गोवा अगेन्स्ट कोलचे समन्वयक ओलेन्सीयो सिमॉईश यांच्यावर ग्रामसभेत अडथळा आणल्याचा ठपका कुठ्ठाळीच्या सरपंच सोनिया पेरेरा व उपसरपंच रेमंड डिसा यांनी ठेवला. यावेळी त्यांना सरपंच व उपसरपंचांनी ग्रामसभेत पंच सदस्यांना अडथळा करू नका असे सूचविले. यावरून प्रचंड गदारोळ झाला.

यावेळी सरपंच व उपसरपंच तसेच पंच सदस्यांना अपशब्द वापरल्याने शेवटी सरपंच सोनिया पेरेरा यांनी वेर्णा पोलिसांना पाचारण केले. यावेळी सभा अर्ध्यावरच तहकूब करण्यात आली. वेर्णा पोलिसांनी गोवा अगेन्स्ट कोल ग्रामस्थांना तसेच ओलेन्सीयो सिमॉईश यांना वेर्णा पोलीस स्थानकात नेले. यावेळी अपशब्द वापरल्याप्रकरणी रायन गोम्स याला ताब्यात घेतले. सरपंच पेरेरा यांनी रायन गोम्स याच्याविरुद्ध ग्रामसभेत अडथळा निर्माण करून आपणास अपशब्द वापरले तसेच धमकी दिल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले व अटक केली.