यूपीए सरकारचा गुजरातच्या विकासाला विरोध होता

0
170

>> पंतप्रधानांची गुजरातमध्ये जोरदार टीका

मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यावेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने विकासाला सातत्याने विरोध केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भावनगर गुजरातमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत केला.

पंतप्रधान श्री. मोदी हे काल रविवारी गुजरातच्या दौर्‍यावर आले. गेल्या महिन्याभरातील मोदींचा हा तिसरा गुजरात दौरा आहे. विकासाच्या मुद्द्यावरून भाजपला सातत्याने लक्ष्य करणार्‍या कॉंग्रेसवर रविवारी मोदींनी जोरदार हल्ला चढवला. यूपीए सरकारने केलेल्या विरोधामुळेच गुजरातचा विकासही त्यावेळी ठप्प झाला असे मोदी पुढे म्हणाले.

यावेळी त्यांनी घोघा-दहेजदरम्यान ’रो-रो फेरी’ सेवेचा शुभारंभ केला. त्यानंतर भावनगरमधील जाहीर सभेत विकासाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. मी मुख्यमंत्री असताना केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारने गुजरातचा विकास रोखण्यात कोणतीच कसर सोडली नाही, असा आरोप त्यांनी केला.

वापीपासून कच्छमधील मांडवीपर्यंत विकासाची दारे बंद करण्यात आली होती. पर्यावरणाच्या नावाखाली उद्योग बंद पाडण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी किती संघर्ष करावा लागला हे मलाच ठाऊक असल्याचे श्री. मोदी पुढे म्हणाले.

हार्दिक पटेलचे दोन
साथीदार भाजपमध्ये
दरम्यान, गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचे सहकारी वरुण पटेल आणि रेश्मा पटेल या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी हार्दिक पटेल यांना कॉंग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे निमंत्रण दिल्यानंतर काही तासांच्या आत या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वरुण आणि रेश्मा हे दोघे जण हार्दिक पटेलच्या पाटीदार आंदोलन समितीच्या प्रमुखांपैकी एक होते. तसेच भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते.