काबूल विमानतळाजवळ पाच रॉकेट हल्ले

0
46

>> एअर डिफेन्स सिस्टममुळे झाला बचाव; परिसरात धुराचे लोळ

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा एकदा रॉकेट हल्ला करण्यात आला. काबूल विमानतळाजवळ पाच रॉकेट डागण्यात आले; मात्र एअर डिफेन्स सिस्टममुळे हे हल्ले रोखण्यात आल्याची माहिती अमेरिकन अधिकार्‍यांनी दिली. रॉकेट हल्ल्यामुळे परिसरात धुराचे लोळ दिसत होते. सकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला.

अमेरिकन सैन्य अफगाणिस्तामधून माघारी जाण्यासाठी काही तासांचा अवधी उरला आहे, तर दुसरीकडे तालिबानी राजवटीच्या धसक्यामुळे अनेक अफगाणी नागरिकांनी देशाबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात १३ अमेरिकन जवानांसह १०० हून अधिक ठार झाले होते. त्यानंतर रविवारी देखील स्फोट झाला होता.
सोमवारी सकाळी करण्यात आलेला रॉकेट हल्ला कोणी केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.

भारत-पाक वादात पडणार नाही : तालिबान
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या वादात अफगाणिस्तान पडणार नाही. तालिबानला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध हवे आहेत, असे तालिबानी नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझई यांनी म्हटले आहे.