आमदार वीरेश बोरकर यांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या विविध मागण्या; मुख्यमंत्र्यांकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन
नगरनियोजन कायद्याच्या कलम 39 अ विरोधात आझाद मैदानावर मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या आमदार वीरेश बोरकर यांची काल सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत आमरण उपोषण मागे घेण्याचे आवाहन त्यांना केले. मात्र जोपर्यंत कलम 39 अ रद्द होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार आमदार वीरेश बोरकर यांनी काल रात्री व्यक्त केला. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, टीसीपी कलम रद्द करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने ठराव संमत करावा, आगामी अधिवेशनात हे कलम रद्द करण्यासाठी विधेयक मांडावे, तसेच या कलमांतर्गत मान्यता दिलेले प्रस्ताव रद्द करण्यासाठी संबंधित न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशा मागण्या वीरेश बोरकर यांनी केल्या. राज्य सरकारने आंदोलनाची आणि मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनी वीरेश बोरकर यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
येथील आझाद मैदानावर टीसीपीचे कलम 39 अ रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती खालावल्याने सोमवारी मध्यरात्री त्यांना येथील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी काल सकाळी 11 वाजता पुन्हा आझाद मैदानावर दाखल होत आमरण उपोषण सुरुच ठेवले. वीरेश बोरकर यांच्यासमवेत तुषार गावस ह्या युवकाने सुध्दा आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. काल दिवसभरात अनेकांनी वीरेश बोरकर यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.
मनोज परब यांचे
विजय सरदेसाईंवर टीकास्त्र
आमदार वीरेश बोरकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर काल पुन्हा आझाद मैदानावर आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी महाआंदोलनाच्या वेळी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. सरदेसाई यांचे सरकारमधील अनेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. टीसीपीचे कलम 16 ब हे वादग्रस्त कलम विजय सरदेसाई यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच लागू करण्यात आले होते. हेच 39 अ कलमाचे मूळ आहे. या वादग्रस्त विधेयकाच्या वेळी त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नव्हता, याची आठवण मनोज परब यांनी करून दिली.
विरोधी पक्षांच्या
नेत्यांनी घेतली बैठक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार वीरेश बोरकर यांची भेट घेतल्यानंतर उपोषण आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांची संयुक्त बैठक आझाद मैदानावर घेण्यात पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार व्हेन्झी व्हिएगश, आमदार एल्टन डिकॉस्टा, आपचे वाल्मिकी नाईक, सुनील कवठणकर, आरजीपीचे मनोज परब व इतरांची उपस्थिती होती.
पोलीस निरीक्षकाची बदली
नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात आंदोलन करणारे आमदार वीरेश बोरकर व इतर आंदोलकांना अन्यायकारक रितीने कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्याच्या प्रकरणात पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, पोलीस शिपाई शुभम भोसले आणि धनंजय परब यांची उत्तर गोवा राखीव विभागात काल तडकाफडकी बदली करण्यात आली. पणजी पोलीस स्थानकाचा तात्पुरता ताबा आगशी पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी पोलिसांच्या बदलीची मागणी केली होती.
तातडीची उच्चस्तरीय बैठक
उपोषण करणाऱ्या आमदार बोरकर यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यासोबत काल रात्री एक तातडीची उच्चस्तरीय बैठक आल्तिनो पणजी येथील सरकारी निवासस्थानी घेतली. यावेळी मुख्य नगरनियोजक वर्टीका डागूर यांचीही उपस्थिती होती.
वीरेश बोरकर यांच्या मागण्या कोणत्या?
नगरनियोजन कार्यालयात आंदोलन करणाऱ्यांना जबरदस्तीने खेचून बाहेर काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी.
नगरनियोजन कायद्याचे कलम 39 अ रद्द करावे.
सांतआंद्रे मतदारसंघात टीसीपी कलम 39 अ खाली मान्यता दिलेले 9 प्रस्ताव रद्द करावेत.
कलम 30 अ रद्दबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव संमत करावा.
टीसीपी 39 अ खाली मान्यता दिलेले प्रस्ताव रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे.
राज्य सरकारने आगामी विधानसभेच्या अधिवेशनात टीसीपी कलम 39 अ रद्द करण्याबाबत विधेयक सादर करून संमत करावे.
मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा : मुख्यमंत्री
आमदार वीरेश बोरकर यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत आपल्या चिंता आहे. त्यामुळे आपण त्याच्या मागण्याबाबत सकारात्मक बोलणी केली असून, आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. बोरकर यांना त्यांचे मुद्दे चर्चा आणि विधानसभेच्या माध्यमातून सोडवून घेण्याची सूचना केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोरकर यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.