कर्नाटकातील चौघांसह दोघां स्थानिकांना अटक

0
39

>> हणजूण येथील सागर नाईक खून प्रकरण

हणजूण येथील खासगी वाहनतळावर झालेल्या हाणामारीत जीव गमावलेल्या सागर नाईक यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या आरोपावरून हणजूण पोलिसांनी कर्नाटकातील चार जणांना काल अधिकृत अटक केली. तसेच या खून प्रकरणी पोलिसांनी दोघां स्थानिकांना देखील काल अटक केली.

बंगळुरू येथील ५ पुरुष आणी ३ महिला पर्यटकांचा गट गोवा पर्यटनासाठी आला होता. कळंगुटमध्ये भ्रमंती केल्यानंतर शुक्रवारी दुपारी हणजूण-वागातोर किनार्‍यावर ते पोहोचले. त्यांची कार नादुरुस्त झाल्याने ते हणजूणच्या प्रवेशद्वारातच अडकले. यावेळी नादुरुस्त कारमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने संतापलेल्या सागर नाईक या वाहनतळ कर्मचार्‍याने त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी नाईक यांनी रागाच्या भरात आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांच्यावर दंडुक्याने हल्ला चढवला. त्याचवेळी नाईक यांना हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर या पर्यटकांनी तेथून पळ काढला; मात्र पाळोळे येथे स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

या प्रकरणी सुब्रमण्या एम. (४४), चेतन नायक्का (२६), वरुण कुमार सुब्रमण्या (२०) आणि तेजस सुब्रमण्या (१९) यांना काल अधिकृत अटक करून त्यांची हणजूणच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गितेश गोविंद चिमुलकर (२८, रा. डिमेलोवाडा-हणजूण) आणि सर्वेश सूर्या हळदणकर (२४, रा. सोरांटोवाडा-हणजूण) यांनाही अटक करून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.