कदंब बसेसवर ‘ती’ जाहिरात कायम राहणार

0
109

कदंब महामंडळाच्या काही बसेस्‌वर जी गर्भनिरोधकाची जाहिरात आहे तिला राज्यातील काही महिला संघटनांनी विरोध केलेला असला तरी ती काढून टाकण्यात येणार नसल्याचे कदंब महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांने काल सांगितले.

देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र व विविध राज्य सरकारे मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्वारे गर्भनिरोधकांची जाहिरात करीत असतात. ही जाहिरात समाजाच्या भल्यासाठीच असल्याने ती काढून टाकण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे या अधिकार्‍यांने सांगितले. गर्भनिरोधकाच्या जाहिराती विविध टीव्ही वाहिन्यांवर दिवस-रात्र चालू असतात. त्यांना महिला संघटना का विरोध करीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. गर्भनिरोधकाच्या जाहिराती या भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशासाठी हिताच्याच असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.