मनपाला मिळणार १ हजार कचराकुंड्या

0
71

>> महापौर फुर्तादो यांची माहिती

 

नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर पणजी महानगर पालिकेला सुमारे एक हजार कचराकुंड्या (ट्रॉली बिन्स) स्वच्छ भारत योजनेखाली मिळणार असल्याचे पणजी महानगर पालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल सांगितले.
आपण मागच्या वेळी महापौर झालो होतो तेव्हा आपण नगरविकास खात्याकडे कचरा पेट्यांची मागणी केली असता १५ हजार लहान कचराकुंड्या विकत घेण्याचा प्रस्ताव खात्याने महापालिकेला दिला होता. त्यावेळी आपण नगरविकास खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना स्वच्छ भारत योजनेखाली महापालिकेला चक्रे असलेल्या मोठ्या कुंड्या मोफत मिळवून देण्याचे साकडे घातले होते. त्यांनी वरील मागणी मान्य केली होती. मात्र, कुंड्या मिळू शकल्या नव्हत्या. त्या मंजूर झालेल्या कुंड्या आता नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर महापालिकेला मिळणार असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.
नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर या कुंड्यांसाठी निविदा काढावी लागणार असल्याचे फुर्तादो यांनी स्पष्ट केले. या १ हजार कुंड्यांपैकी ५०० काळ्या व ५०० हिरव्या कुंड्या असतील. काळ्या कुंड्या या सुक्या कचर्‍यासाठी तर हिरव्या कुंड्या या ओल्या कचर्‍यासाठी असल्याचे ते म्हणाले.