किंगफिशर व्हिलाचा आज तिसर्‍यांदा लिलाव

0
99

>> विजय मल्या यांचा आलिशान बंगला

बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून भारताबाहेर पसार झालेले विजय मल्या यांच्या संपत्तीचा लिलाव करून वसुलीची प्रक्रिया सुरू असून कांदोळी येथील त्यांचा ‘किंगफिशर व्हिला’ आज तिसर्‍यावेळी व मुंबईतील किंगफिशर हाऊसचा चौथ्यांचा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ९० कोटी रुपये किंमत असलेल्या या किंगफिशर व्हिलाच्या राखील किमतीत १० टक्के कपात करण्यात आली आहे.
एसबीआयकॅप्स ट्रस्टतर्फे कर्जवसुलीसाठी आज पुन्हा एका विजय मल्या यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. किंगफिशर व्हिलाचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी राखीव किंमत ८५.२९ कोटी ठेवण्यात आली होती. मात्र, इच्छुक बोलिधारकांना ती किंमत जास्त वाटल्याने कोणीही रस दाखविला नव्हता. त्यामुळे या बहुचर्चित व्हिलाचा लिलाव फसला होता.
गेल्या वर्षी २१ डिसेंबरला हा बंगला लिलावाद्वारे विकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न कर्ज दिलेल्या १७ बँकांनी केला होता. त्यावेळी राखीव किमतीत ५ टक्क्यांनी घट करून बोलीची किमान किंमत ८१ कोटी ठेवण्यात आली होती. मात्र, दुसर्‍यावेळीही कोणीही बोली न लावल्याने लिलावाचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला
होता. किंगफिशर बंगला विजय मल्या यांच्या युनायटेड ब्रिव्हरीज होल्डिंग्सच्या नावावर असून किंगफिशर एअरलाइन्स कंपनीसाठी कर्ज घेण्यासाठी २०१० मध्ये बँकांकडे गहाण ठेवण्यात आला होता. वरील बंगल्यात विजय मल्या यांनी त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी अनेक बड्या पार्ट्यांचे आयोजन केले होते.