Home बातम्या कडक लॉकडाऊन करा

कडक लॉकडाऊन करा

0

>> भाजप आमदारांची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप आमदारांच्या घेतलेल्या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी मोडून काढण्यासाठी बहुसंख्य आमदारांनी कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि बळीच्या प्रमाणात होणारी वाढ मोठा चिंतेचा विषय् बनला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंध घालूनसुद्धा नव्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत नाही. काही नागरिकांकडून कोविड निर्बंधाचे पालन केले जात नाही. राज्याच्या ग्रामीण भागात सुध्दा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूचे वाढते प्रमाण रोखणे मोठे आव्हान आहे, असे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.

केपे भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तात्पुरते इस्पितळ आणि प्राणवायू खाटा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत बहुसंख्य आमदारांनी लॉकडाऊनबाबत आपली मते मांडली. मुख्यमंत्री डॉ. सावंत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.

लॉकडाऊनची जीसीसीची मागणी
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाच्या वाढत्या बळींची साखळी मोडून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी राज्यात १५ दिवस पूर्ण लॉकडाऊन करावे अशी मागणी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठविलेल्या एका निवेदनात काल केली.
कोरोनाची वाढती साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊनची नितांत गरज आहे, असे जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो यांनी निवेदनात म्हटले आहे.
आर्थिक स्थिती कायम ठेवण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. राज्यात ग्रामपंचायती, नगरपालिकांनी आपआपल्या भागातील कोरोना गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन सुरू केले असल्याचे काकुलो यांनी म्हटले आहे.