ओंकार हत्तीने सध्या कासुले – उगवे परिसरात बस्तान मांडले असून बागायतींची नासधूस करण्याबरोबरच लोकवस्तीत घुसून लाल व सफेद रंगाच्या वाहनांना लक्ष्य करण्यास सुरवात केल्याने लोक भयभीत झाले आहेत. गुरुवारी रात्री कासुले – उगवे परिसरात हत्तीने एका कारचे नुकसान केले. दरम्यान, वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी या हत्तीचा बंदोबस्त करण्यास तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी मोपा सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे. निगळे, पोरसकडे परिसरात हानी केल्यानंतर हत्तीने कासुलेमार्गे उगवे परिसरात मोर्चा वळविला आहे. हत्ती लोकवस्तीत फिरत असल्याने रात्री-अपरात्री कामाच्या निमित्ताने घराबाहेर जाण्यासाठी लोक आता घाबरत आहेत. हत्तीने वाहनांची मोडतोड करण्यास सुरूवात केल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 63 दिवसांपूर्वी हत्तीने पत्रादेवी, फकीरफाटा, कडशी, मोपा, तोरसे, तांबोसे परिसरात भातशेती, कवाथे, केळी, माड, पोफळीच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.