ऑक्टोबरचे ‘गृहआधार’ मानधन शुक्रवारपर्यंत : लाभार्थींना दिलासा

0
94

 सामाजिक योजना डोईजड ठरण्याची चिन्हे
गृह आधार योजनेंखालील लाभार्थींना येत्या शुक्रवारपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकेल. त्यामुळे गृहिणीना गोंधळून न जाण्याचे आवाहन महिला आणि बालक कल्याण खात्याचे संचालक विकास गावणेकर यांनी केले आहे.वित्त खात्याने काल दुपारी या योजनेसाठी १३ कोटी रुपये वितरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. राज्यातील गृहिणींच्या खात्यात वरील आर्थिक सहाय्य जमा होण्यास दहा दिवस विलंब झाला होता. त्यामुळे लाभार्थी बॅकांमध्ये जाऊन रिक्त हस्ते परत येत होत्या. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेल्याने वरील योजनेचे काय झाले, असा प्रश्‍न लाभार्थींना पडला होता.
अनेक योजना डोईजड
ऑक्टोबर महिन्याची लाभार्थिंची गरज भागविण्यात आली असली तरी राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनल्याने सरकारला या सामाजिक योजना डोडीजड झाल्या आहेत. वित्त खात्याच्या अधिकार्‍यांचीही त्यामुळे बरीच तारांबळ उडत असल्याचे सांगण्यात येते. या योजनेखालील लाभार्थिंची संख्या १ लाख १७ हजारांवर पोचली आहे. दर महा गृहिणींना १२०० रुपये देण्याच्या तरतुदीमुळे दरमहा राज्याच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटी रुपयांचा भार पडतो.
सद्यपरिस्थितीत सामाजिक योजना पुढे नेणे हे सरकारसमोर मोठे आव्हान आहे. परिणामी मुख्यमंत्री पार्सेकर यांना या योजनांच्या आर्थिक जुळवाजुळवीसाठी कसरत करावी लागणार आहे.