एअर इंडियाच्या विमानाला अपघात : प्रवासी सुखरूप

0
124

‘दाबोळी’च्या धावपट्टीवरून उड्डाणापूर्वी पक्षाची धडक
दाबोळी विमानतळावर काल वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होण्यापासून बचावले. मुंबईमार्गे दिल्लीला जाणार्‍या या विमानात १६४ प्रवासी होते. हे सर्वजण सुखरुप असल्याचे सांगण्यात आले.याबाबत वृत्त असे की येथील दाबोळी विमानतळावर काल सकाळी ७.४० मी. गोवा ते दिल्ली व्हाया मुंबई हे एअर इंडियाचे विमान दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाणासाठी जात असताना अचानक वैमानिकाला समोर एक पक्षी दिसला. वैमानिकाने प्रसंगावधान राखून करकचून ब्रेक मारला. परंतु सदर पक्षी विमानाच्या इंजिनाकडे आत शिरला. त्यामुळे विमानाच्या एका इंजिनचे बरेच नुकसान झाले. तसेच पंख्याचेही पण बरेच नुकसान झाले. सुदैवाने विमानातील १६४ पैकी कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. दिल्लीला जाणार्‍या प्रवाशांची हॉटेलात रवानगी करण्यात आली. तद्नंतर त्या प्रवाशांना दुपारी ३.३० वाजता गोवा-दिल्ली या विमानातून पाठविण्यात आले. तर मुंबईच्या प्रवाशांना दुपारच्या विमानाने मुंबईला पाठविण्यात आले. विमान नादुरुस्त झाल्याने विमानतळावरच ठेवून दुरुस्तीचे काम चालू होते. संध्याकाळी उशीरापर्यंत दुरुस्ती काम चालू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या आपघाताबाबत विमानतळाचे संचालक के. एस. राव यांनी दुजोरा दिला. पक्षी आदळल्यामुळे हा अपघात घडला असून त्याची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.