‘ऍलर्जी’ म्हणजे काय?

0
682
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

काही त्रास हे आनुवंशिक असतात. त्यांची चिकित्सा करणे खूपच अवघड जाते. जेथे आपल्याला वाटते की अमुक गोष्टींमुळे आपल्याला किंवा इतरांना त्रास होतोय, त्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात. प्रत्येक गोष्ट ही सर्वानाच चालून जाईल, उपयोगी पडेल असे नाही होत. त्यांचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात.

ऍलर्जी म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी/अन्नांबाबत अहितकारक प्रतिक्रिया निर्माण करणारी शरीराची आरोग्यविषयक स्थिती. येथे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली (इम्यून सिस्टम) परकीय पदार्थ/ऍलर्जी संप्रेरकाला अतिप्रतिरोध करते, विरोध करते, अतिसंवेदनशील होते आणि ह्याचमुळे शरीरामध्ये विविध लक्षणे उत्पन्न होतात जी सौम्य किंवा तीव्र, प्राणघातक/जीवघेणी अशा दोन्हीही प्रकारची असू शकतात. प्रत्येक मनुष्यामध्ये, व्यक्तिनुसार त्यांच्या प्रकृती, वय, बल इ.नुसार ती वेगवेगळी असते. सगळ्यांना होईलच किंवा असेलच असे नाही. काही बर्‍याही होतात तर कित्येक प्रकारच्या ऍलर्जी ह्या पूर्ण आयुष्यभर राहतात वा असतात. ती एखाद्या पदार्थाला शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची एक प्रतिक्रिया असते, ज्यामुळे बहुतांश लोकांना कसलीही हानी होत नाही. निरोगी लोकांची रोगप्रतिकार प्रणाली एखाद्या जंतूविरुद्ध लढते, तथापि, ऍलर्जी असलेल्या लोकांना, रोगप्रतिकार प्रणाली एक जंतू नसलेल्या पदार्थालाही अतिप्रतिक्रिया देते. ऍलर्जीसंबंधी रोगांमध्ये पर्यावरण आणि आनुवंशिक घटक दोन्ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
जगात पूर्ण लोकसंख्येच्या जवळपास १० ते ३०% दमा, र्‍हायनायटीस, खाद्यपदार्थांची ऍलर्जी, एक्झीमा, अर्टीकॅ रिया, एनाफायलेक्सीस सारख्या ऍलर्जींनी ग्रस्त असल्याचे सापडते.

र्‍हायनायटीसमध्ये नाकाच्या आतील बाजूस असलेल्या श्लैष्मिक त्वचेला सूज येऊन सर्दी होते, नाक चोंदणे, नाक सतत वाहू लागते (नाकातील इर्रिटेशनमुळे क्षोभामुळे त्या सुजेमधून सतत पाणी पाझरू लागते), एकसारख्या शिंका येतात (शिंका येऊन येऊन अक्षरशः हैराण व्हायला होते), नाकामध्ये सतत खाज येते, वास न येणे/वास घेणे अवघड होणे, डोके जड होते (जास्त शिंका आल्याने अधिक प्रमाणात होत असते), क्वचितवेळी चक्करसुद्धा येते आणि ही सर्व लक्षणे ऍलर्जीक र्‍हायनायटीस प्रकारामध्ये आढळतात. व्याधीच्या नावाप्रमाणे ही ऍलर्जीमुळेच होते. धूळ, धूर (जे धुळीच्या ठिकाणी, शेतात, कारखान्यात काम करतात, हवेतील प्रदूषणामुळे, अगरबत्ती-सिगरेट-आगीचा धूर देखील), तिखट पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने होते. थोड्यांना दूध, अंडे, चॉकलेट (कोकोआ), सायट्रस फळे (लिंबू, द्राक्षे, संत्री, मोसंबी इ.), मच्छी (खेकडे, झिंगे/प्रॉन्स, शेल फिश इतर), चिकन खाल्ल्यानेदेखील ही वरील सर्व लक्षणे चालू होतात व ह्यालाच ऍलर्जीक र्‍हायनायटीस म्हणतात. त्याव्यतिरिक्त हवामानात बदल झाल्याने (विशेषकरून हिवाळा, पावसाळासारख्या थंडगार ऋतूमध्ये/प्रदेशात, मळभ दाटून आल्याने देखील), पाळीव प्राणी जर घरात असतील तर त्यांच्या अंगावरील केस-फर, सूक्ष्म जीव यांच्या संपर्कात आल्याने, एकटक सूर्याकडे बघितल्याने, नाकामध्ये सतत दोरा, गवत यांसारखे काहीतरी घालून खाजवल्याने, उग्र वास (परफ्युम, पावडर, डिओडोरन्ट सारखे इतर केमिकल्स व सौंदर्य प्रसाधने), घाण कुजलेल्या पदार्थांचा वास घेतल्याने (घरातील कचरा/गार्बेज डंपिंग यार्ड मधील इ.), जंतू (बॅक्टेरिया इ.), काही प्रकारची औषधे (ऍस्पिरिन, हायपोटेन्सिव सारख्यांच्या अतिवापरामुळे).
हॉर्मोन्सच्या असंतुलन (गरोदरपणात इ), मानसिक तणाव (जास्त रडल्याने, दु:ख झाल्याने इ.) किंवा नाकाच्या आतील इतर एखाद्या व्याधीमुळेही (अर्श/पॉलीप, हायपरट्रॉफी टरबीनेट्स) ऍलर्जीक र्‍हायनायटीस होऊ शकतो.

जसे नाकाच्या संबंधित ऍलर्जीक र्‍हायनायटीस आहे तसेच डोळ्यांच्या संबंधित आहे ‘ऍलर्जीक कन्जंक्टिव्हायटीस’. ग्रामीण भाषेमध्ये डोळे येणे/डोळ्यांची साथ येणे असे ज्याला आपण म्हणतो त्याचाच एक प्रकार. कारणे जवळपास सर्व एकसारखीच आहेत. त्यातही काजळ, लायनर, कॉंटॅक्ट लेन्स/लेन्स सोल्यूशन, ड्रॉप्स (डोळ्यामध्ये घालण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधी किंवा चुकीच्या औषधी जर वापरण्यात आल्या तर), धूर-मातीचा/धुळीचा कण डोळ्यांमध्ये गेल्याने (फॉरेन बॉडी ज्याला आपण म्हणतो) यासारख्या गोष्टींचीही ऍलर्जी होऊ शकते जे सौंदर्य प्रसाधनामध्ये येते. कन्जंक्टायवा म्हणजेच डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांची आतील बाजू जी डोळ्यांच्या श्वेत/सफेद बाजूवर देखील असते. आणि येथेच सूज आल्याने डोळे लाल होतात, अश्रुस्राव होतो (सतत पाणी येत राहणे), डोळ्यांना सतत खाज सुटते, लख्ख प्रकाशाचा त्रास होतो, सतत डोळ्यांमध्ये काहीतरी गेल्या/लागल्या सारखे वाटणे, इर्रिटेशन होणे इत्यादी.

नाक, कान, घसा, डोळे हे एकमेकांशी जोडलेले आणि संबंधित असल्या कारणाने तेथील व्याधी हे एकामेकांच्यात प्रसार होऊ शकतात. नाक, डोळे यामधील ऍलर्जी ही घशामध्ये जाऊन तेथे ‘ऍलर्जीक फॅरिंजायटीस’ नावाचा व्याधी उत्पन्न करतो ज्यामध्ये घशाच्या मागील बाजूस(फॅरिंक्स) सूज येते, घसा सतत खवखवतो, खाज येते, दुखतो, घशामध्ये टोचल्यासारखे वाटते, अन्न-द्रव गिळायला त्रास होणे अशी लक्षणे असतात. आणि हेच इन्फेक्शन मग इतर व्याधींसाठी कारणीभुत ठरते जसे की मुखामधील व्याधी(टॉन्सिलायटीस इ), छातीमध्ये जाऊन खोकला, दमा (श्वास लागणे/अस्थमा), छाती गच्च झाल्यासारखे/भरल्यासारखे वाटणे इत्यादी.

आहारामधील एक घटक जो काही लोकांमध्ये जास्त प्रमाणात ऍलर्जी उत्पन्न करतो तो म्हणजे ग्लूटेन आणि यामुळे जे होते ते ‘ग्लूटेन इन्टॉलरन्स’. ग्लूटेन हे एक प्रकारचे प्रथिन आहे जे गहू(व्हीट), जव/सातू(बार्ली) सारख्या धान्यांमध्ये असते. ग्लुटेन इन्टॉलरन्स जर असेल तर पचन व्यवस्थित न होणे व त्यामुळे शौचास- संडासला पातळ होणे (डायरिया), अगदीच न होणे/कष्टाने होणे(कॉन्स्टीपेशन); शौचास घाण वास येणे, पोटात कळ मारून येणे, पोट वायूमुळे फुगल्यासारखे वाटणे (शौचास बंद झाल्याने, गुदाद्वारे अपान वायूचे नि:स्सरण व्यवस्थित होत नाही/बाहेर जात नाही त्यामुळे पोटात/आंत्रामध्ये (इन्टेस्टाईन) वायू साठून राहतो किंवा वरच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतो (असे झाल्यास ढेकर इत्यादी चालू होतात) ही लक्षणे असतात. त्याव्यतिरिक्त थकवा जाणवणे, उलटी झाल्यासारखे वाटणे किंवा होणे, डोकेदुखी सोबत सांधेदुखी, चक्कर येणे, क्वचितवेळी डिप्रेशन हेही असू शकते.
‘एफ.पी.आय.ई.एस.’ म्हणजेच ‘फूड प्रथिन इन्ड्यूस्ड एन्टेरोकोलायटीस सिंड्रोम’ हीसुद्धा एक प्रकारची ऍलर्जी आहे जी प्रोटीनयुक्त काही गोष्टी खाल्ल्यानंतर (विशेषतः अंडे, दूध, सोया, काही विशिष्ट धान्य इत्यादी) उशिराने येते आणि यात उलट्या आणि शौचास पातळ होते. अशाने शरीरातील पाण्याच्या अंश कमी होऊन डिहायड्रेशन झाल्याने चक्करही येते, रक्तदाब कमी होऊन शरीराला रक्तपुरवठा कमी होतो. हल्ली ‘वेगन डायट’चे फॅड जे आले आहे ते थोडे घातक ठरू शकते. शाकाहार खाऊ नये असा अर्थ मुळीच घेऊ नये. पण सारासार विचार करूनच आपला आहार- विहार बदलावा.
काही लोकांना ‘लेटेक्स’ची सुद्धा ऍलर्जी असते. लेटेक्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा रबर. लेटेक्सपासून ग्लोवस (हातमोजे), कंडोम, ल्युब्स (गर्भनिरोधक), कॅथेटर (एनिमा/बस्ती साठी), फुगे (बलुन) इतर गोष्टी बनविल्या जातात. जी अंतर्वस्त्रे वापरली (पुरुष व स्त्री दोन्हींसाठी) जातात त्याच्या रबरचीसुद्धा ऍलर्जी होऊ शकते. स्किन म्हणजेच त्वचेची ऍलर्जी ही आजकाल खूप प्रमाणात दिसून येते. अर्टीकेरिया (पिताम येणे) हे त्वचेच्या ऍलर्जीचेच एक उदाहरण. आतापर्यंत वरील उल्लेखित कारणे तर आहेतच. त्यागोष्टी खाल्ल्याने/ केल्याने लगेचच त्वचेला खाज सुटते, अंगावर चकते/दादड येतात, अंगाची लाही लाही होते, त्वचेचे केस गळून पडतात, कोंडा होतो, त्वचेच्या खपल्या निघतात, त्वचा निस्तेज होते, काळपट पडते. म्हणूनच एखादे सौंदर्यप्रसाधन वापरत असतानादेखील तेवढीच काळजी घेणे महत्त्वाचे.. जेवढी आहार-विहार संबंधित घेऊ. प्रत्येक गोष्ट ही सर्वानाच चालून जाईल, उपयोगी पडेल असे नाही होत. त्यांचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. काळजीपूर्वक वापराव्यात.
‘ऍनाफायलॅक्टिक शॉक’ ही अशी एक अवस्था ज्यामध्ये त्या मनुष्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. यामध्ये वरील हेतूंमुळे आपली रोगप्रतिकारक प्रणाली असे काही रासायनिक द्रव्ये रक्तामध्ये सोडते ज्याने रक्तदाब कमी होऊन, श्वासोश्वास प्रक्रियेला त्रास होतो, श्वासक्रिया बंद होऊन (वायुमार्ग अरुंद होतो) आणि मृत्यू देखील होऊ शकतो. त्यासोबत नाडीगती जलद होते (रॅपीड पल्स), हृद्गती वाढते, उलट्या होतात, अंगावर खाज सुटते/लाल दादड येतात, सूज येते, नाक बंद होते किंवा सतत वाहू लागते.

काही त्रास हे आनुवंशिकदेखील असतात. त्यांची चिकित्सा करणे खूपच अवघड जाते. जेथे आपल्याला वाटते की अमुक गोष्टींमुळे आपल्याला किंवा इतरांना त्रास होतोय, त्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात.

लिवोसेट्रीझीन, सेट्रीझीनसारख्या आधुनिक ऍटी-ऍलर्जीक औषधांनी काही काळ लक्षणे कमीही होतात पण व्याधी मात्र बरा होत नसतो. या औषधांच्या अतिवापराने उलट तंद्री (ड्रावजीनस) येणे सारखे दुष्परिणाम चालू होतात. पण तरीही तज्ञांचा/वैद्यांचा सल्ला आवश्यक घेणे. स्वतः उपचार करत बसू नये. व्याधी अधिकच चिघळू शकतो. या सर्व तक्रारींमध्ये आयुर्वेदीय उपचार उत्तमरीत्या काम करतात.