उदरभरण नोहे….

0
343
  •  माधुरी रं. शे. उसगावकर

थोडी कार्यकुशलता आणि आरोग्यविषयक टीप्स यांची सांगड उत्तम जमली की आरोग्याची काळजीही घेतली जाते आणि नवीन पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे दुहेरी समाधान प्राप्त होते. संचारबंदीच्या काळात गृहिणींच्या प्रतिभांना फुटलेले धुमारे आणि खवय्यांचा रुचिपालट… आहे की नाही तरणोपाय? जपा आरोग्य आपले.. मंत्र आहाराचा.

आपली प्राचीन संस्कृती ही शास्त्रोक्तरीत्या पूर्वापार परिपूर्ण होती. छान जीवनाबद्दलची उद्दिष्टे, चालिरीती या व अशा अनेक संस्कारयुक्त संस्था पूर्वकालीन संस्कृतीत आढळून येतात. सुसंस्कार हा तर आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. लहानपणी शालेय जीवनात आम्हाला शिकविलं जायचं –

‘‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म|’’

शेवटी आम्ही जोर देऊन ‘जय जय रघुवीर समर्थ’ असे म्हणायचो. हा श्‍लोक आमच्याकडून घोकून घेतला जायचा. त्यावेळी बाल्यावस्थेत त्याचा अर्थ कळत नव्हता. आमच्या गावी चौसोपीच्या पूर्वजांच्या घरात आमचे वाडवडील समर्थ रामदासांचे श्‍लोक, भूपाळ्या म्हणायचे. माझे वडील श्‍लोक म्हणून अर्थासह आमच्याकडून पाठ करून घ्यायचे. पण त्यावेळी त्या श्‍लोकाचा पूर्णार्थ समजणे बालमनाच्या पलीकडचे होते. नंतर हळूहळू अर्थ समजू लागला तेव्हा त्या श्‍लोकांचं महत्त्व कळून आलं.

जेवायला बसताना वरील श्‍लोक म्हणत असत. आता देवळात, मठात, धार्मिक कार्यात श्‍लोकपठण होते. भुकेला अन्नाची आहूती देणे म्हणजे यज्ञकर्म. पोटाची खळगी भरणे नव्हे. जो अग्नी जठरात प्रज्वलीत झाला आहे त्याला अन्नाची आहुती देणे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ते पुढ्यात आल्यावर प्रार्थना करावी- ‘तुझी आहुती माझ्यातील अग्नीनारायणाला देत आहे. हे ब्रह्मा, मी तुला नमस्कार करतो. मला पूर्णत्व बहाल कर. या अन्नामुळे माझ्यात सकारात्मक ऊर्जा येऊ दे’… असा त्याचा साधारण अर्थ होतो. समर्थ रामदासांनी या श्‍लोकात साध्या सोप्या सरळ भाषेत अन्नाचे महत्त्व फारच सुंदररीत्या सांगितले आहे.

देह देवाचे मंदिर… असं म्हटलेलं आहे त्याची प्रकर्षाने जाणीव आज होते आहे. कोरोना महामारीला आळा बसावा म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केलेली आहे. त्यात मठ, मंदिरेपण भक्तगणांना बंद झालेली आहेत. तेव्हा देह देवाचे मंदिर.. याला पर्याय नाही. पूर्वी कुटुंबातील परिवारासह एकत्र अन्नग्रहण केलं जायचं.

हल्लीच्या क्वारंटाईनच्या काळात परिवारातील माणसं घरी असल्यामुळे बालपणातील आठवणींना उजाळा मिळाला. या कोरोनामुळे माणसाची जीवनशैली बदलते आहे. कोरोनाने माणसातील माणुसकी जागवली. बाहेरच्या जंक फूडला आळा बसला आहे आणि घरच्या खाण्याचं महत्त्व कळून चुकलं आहे. कसाही असेना का कोरोना, पण माणसाला धडा शिकवून जावा असंच वाटतं. अन्यथा माणसाला बराच अन्नाचा माज आला होता. घरच्या खाण्याचा अवमान आणि बाहेरचं खाणं हे ‘सॉफिस्टिकेटेड’ हा जीवनशैलीचा मापदंड झाला होता. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. प्रत्येकजण आपापल्या विश्‍वात मग्न. संवादाचं सोडाच, बोलणं बंद. यदाकदाचित झालंच बोलणं तर बोलणं कसलं… वादालाच आमंत्रण. चार माणसं घरात असून चारही तोंडं चार दिशांना, अशी अबोल परिस्थिती. जाणते बिचारे! ‘धरलं तर चावतं सोडलं तर पळतं’ या उक्तीनुसार कानाडोळा करून वेळ मारून नेत.

लॉकडाऊनमुळे माणसं घरी जास्त वेळ असल्याने संवाद होतात. ‘बाई’विना सगळी कामं करावी लागल्याने ‘एकमेका साह्य करू..’ हा नियम लागू झाला. गृहिणीला आधार मिळाल्याने फुरसतही मिळते व नवीन नवीन आरोग्यवर्धक ‘मेनू’ केले जातात.
परिवारातील सदस्यांना पचनयुक्त आहाराचे नियमन करणे हे प्रत्येक जागरूक गृहिणीचे कर्तव्यच आहे. कारण अन्न हे ग्रहण करायचं असतं, भराभरा गिळायचं नसतं. तरच ते सुपाच्च होतं. अन्यथा अपचन, अजीर्ण यांना तोंड द्यावं लागतं. ‘आरोग्यम् खलु धर्मसाधनम्’ हे तर आपल्या संस्कृतीचे ब्रीदवाक्यच.

सद्यस्थितीत सगळेजण कामास हातभार लावत असल्याने कामाचा ताण सहसा जाणवत नाही. स्वयंपाक करताना एकत्र कुटुंबपद्धतीतील पूर्वानुभव येतात. हळद-कुंकवाचं बोट लावून अग्नी प्रज्वलीत करणे, जेवणाच्या वेळा सांभाळणे काही बाबतीत तरी पूर्व परंपरांचं बोट धरलं जातं.

प्रत्येक दिवशी नाश्ता, जेवणाचा मेनू वेगवेगळा बनतो. रोज स्वयंपाक आटोपशीर केल्याने फ्रीजमधील अन्नसेवन होत नाही. हा सर्वांत महत्त्वाचा बदल मी म्हणेन. कारण शीतपेटीशिवाय चालत नसलं तरी तीच खरी माणसाच्या आरोग्याची शत्रू.
सध्या बर्डफ्लूमुळे चिकन वर्ज्यच. सुरुवातीला मुलासुनांना फार कठीण वाटत होतं. परंतु प्रत्येक दिवस थरारक कोरोनाच्या वाढत्या आलेखामुळे ती शांत आहेत. पण त्यामुळे स्वयंपाकाचं नियोजन करताना बरीच शक्कल लढवावी लागते. माशांचा जेवणात अंतर्भाव आहे बरं! माशांचे वेगवेगळे प्रकार, पॉपलेटचं भुजणं, बांगड्याची रुच्चीक उडीदमेथी, सुंगटाचं सुक्कं, डांगर, सुरमईच्या डोक्याची कळपुटी, मोरीचं मटण इत्यादी घरीच बनवले जातात. याशिवाय अधुनमधून फणसाची भाजी, खतखते, मुगांच्या गाठी, अळसांदे, दबदबीत अननसाचे, आंब्याचे सांसव हेही प्रकार स्वयंपाकघरात वर्णी लावतात. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळे घरी वेगवेगळे चवदार पदार्थ बनवितो. वेगवेगळ्या पाककृती करण्याचे नामी शोध पण लागतात. मुख्य पदार्थ तोच पण साहित्य वेगवेगळे असते. त्यामुळे रुचिपालट होतो आणि गृहिणींनी बनवाबनवी केल्याचा पुरुषांना, मुलांना थांगपत्ता लागत नाही. उदा. शिळ्या भाताचा फोडणी भात, भाताचा पुलाव, भाताचे पकोडे, भाताची डाळ घालून खिचडी, भाताची पायस (खीर) असे विविध प्रकार बनतात. त्यामुळे पदार्थाला ताजेपणा येतो. तसेच जिभेचे चोचले पण पुरवले जातात. त्याचप्रमाणे इतरही मुख्य पदार्थापासून वेगवेगळ्या पाककृती बनवता येतात. थोडी कार्यकुशलता आणि आरोग्यविषयक टीप्स यांची सांगड उत्तम जमली की आरोग्याची काळजीही घेतली जाते आणि नवीन पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे दुहेरी समाधान प्राप्त होते. संचारबंदीच्या काळात गृहिणींच्या प्रतिभांना फुटलेले धुमारे आणि खवय्यांचा रुचिपालट… आहे की नाही तरणोपाय? जपा आरोग्य आपले.. मंत्र आहाराचा.