उगवतीकडे…

0
239

 – सौ. प्रतिभा कारंजकर (प्रवासवर्णन) भाग- १

नदीच्या पात्रात मधोमध एका छोट्या टेकडीवर हे उमानंद महादेवाचे मंदिर आहे. मंदिराकडे जायला सत्तर पायर्‍या चढून जावे लागते. पायर्‍या सुरू होण्यापूर्वी आपलं स्वागत होतं ते एका सुंदर कमानीने. असं सांगितलं जातं की या छोट्याशा पर्वतटेकडीवर स्वतः श्री शंकर तपस्येला बसले होते.

देशातला बराच भाग नजरेखालून घातला, पण पूर्वांचल म्हणजे जेथून सूर्य आपल्या देशात प्रवेशकरता होतो ते त्याचे पूर्वेकडचे प्रवेशद्वार, तो भाग पाहायचा संकल्प केला होता. काही वर्षांपूर्वी चारधामच्या प्रवासात टूर कंपनीचे मालक आमच्याबरोबर होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की काश्मीर, केरळ, राजस्थान, गुजरात इत्यादी खूपच लोक पाहतात. पर्यटनाच्या दृष्टीने ते पाहण्यासारखेही आहेत. पण आपल्या देशाच्या पूर्वेची राज्ये नक्की किती आहेत, तिथे कुठली शहरे आहेत, लोक कसे आहेत याची ओळख करून घेणे, त्या प्रदेशाला भेट देणे हे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने एक देशकर्तव्य पण आहे.
हिमालयाच्या कुशीतील पश्चिमेकडील काश्मीरपासून नंतर लेह-लडाख, चारधाम, नेपाळ, सिक्कीम, भूतान इत्यादी पाहून झाले होते. मग तेव्हाचे त्यांचे ते सांगणे आठवले आणि पूर्वांचलची टूर त्याच कंपनीची खासियत असल्याने आम्ही यावेळी तिकडे नजर वळवली व जायचा प्लॅन केला. ईशान्येकडील काही वेगळेपण जाणून घेण्याचा हा प्रयत्न. या भागाला ‘सेव्हन सिस्टर्स’ असंही म्हटलं जातं. म्हणजे सात राज्ये, जी बहिणी-बहिणीसारखी एकत्र शेजारी-शेजारी नांदताहेत. आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश असा हा सात राज्यांचा प्रवास. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, ऐतिहासिक परंपरा, खळाळणारी ब्रह्मपुत्रा, घनदाट जंगले व हिमालयाचा लाभलेला पायथा अशी सगळी विशेषणे याला लागू पडतात.
कुठलीही गोष्ट योग आल्याशिवाय घडत नाही असं म्हणतात त्याचा प्रत्यय आला. आम्ही खरंतर ४ नोव्हेंबरची टूर बुक केली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे महिनाभरासाठी परदेशी जावं लागलं आणि ४ नोव्हेंबरची टूर तारीख बदलून ४ डिसेंबरला सुरू झाली. मनापासून केलेली इच्छा उशिरा का होईना पूर्ण होतेच याचीही प्रचिती आली.
आसाम म्हटला की लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात अभ्यासलेली विशेषणे आठवतात. दूरवर नजर पोचेपर्यंत पसरलेले चहाचे मळे, चहाच्या बागेत पाठीला टोपल्या अडकवून चहापानांची खुडणी करणार्‍या बायका, एकशिंगी गेंडा, काझीरंगातली हत्तीवरची जंगलसङ्गार, पाण्यात बांबूच्या आधारावर उभी असलेली पाण्यातली तरंगती घरे, बिहू नाच, नागा लोकांचा नाच अशा कितीतरी गोष्टी नजरेसमोर ङ्गेर धरून उभ्या राहतात. गंगेसारखी तुङ्गान ब्रह्मपुत्रा, दरवर्षीचा तिचा हैदोस, चेरापुंजीचा पावसाचा तडाखा, बांबूची घनदाट वने, बांबूपासून कलात्मक वस्तू बनवणारे तिथले आदिवासी असे सर्व डोळ्यापुढे उभे राहते.
आसाम हे ईशान्य भारतातील राज्य आहे. भूतान आणि बांगलादेश या दोन्हीच्या सरहद्दी आसामला लागून आहेत. आसामच्याही पलीकडे अरुणाचल प्रदेश तसेच बांगलादेशाच्या पलीकडे नागालँड आहे. इथला भाग भारताच्या मुख्य भू-भागापासून दूर असल्यामुळे नेहमीच दुर्लक्षित राहिला. याचा ङ्गायदा ङ्गुटीरवादी मिशनर्‍यांनी घेऊन भारतापासून वेगळे होण्यासाठी ब्रिटिश काळापासून धडपड केली. या सीमावर्ती प्रदेशात म्हणूनच सुरक्षितेच्या कारणासाठी आपले ओळखपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. रस्त्यावर जागोजागी मिलिट्रीची तपासणी नाकी आणि सशस्त्र सैनिकांच्या तुकड्या दिसतात. त्यामुळे इथे येणार्‍या सर्वांना आयडेन्टटीटी दाखवावी लागते. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गुवाहाटीपाहून आमच्या सङ्गरीची सुरुवात झाली.
४ डिसेंबरला अकरा वाजता विमानाने पुणे सोडले. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते गोवाहाटी असा प्रवास होता. दिल्लीत थंडीमुळे लवकरच काळोख दाटून आला होता. सगळीकडे धुक्याचे साम्राज्य पसरल्याने विमानांच्या उड्डाणाला उशीर तर काही उड्डाणे रद्द होत होती. आमचे गोवाहाटीचे विमान सुटेतोवर सनसेट व्हायला आला होता. विमानात बसता बसता मावळतीच्या सूर्याच्या गोलाबरोबर आकाशी झेप घ्यायला सज्ज असलेल्या विमानाचे ङ्गोटो काढण्याचे अनमोल क्षण अनुभवतच विमानात प्रवेश केला. गोवाहाटीला पोचेपर्यंत रात्र झाली होती. विमानतळ छोटेसे पण सुंदर, स्वच्छ, टापटीप होते. हवेत गारवा होता. टॅक्सी करून लॉजवर पोहोचलो. लॉज जरा गावाबाहेर होते. लॉजवर टूरवरचे लोक स्वागताला हजर होते.
दुसर्‍या दिवशी पहाटे चारलाच जाग आली. बाहेर लख्ख उजाडले होते. तेव्हाच जाणीव झाली पूर्वांचल आणि अरुणाचल अशी नावे या भागाला का दिली गेलीत. ती काव्यपूर्ण आहेत. प्रकाशकिरणांची झारी घेऊन येणारी पहिली तिरपी किरणे इथेच आधी पोचतात. लॉजच्या समोरच रस्त्यापलीकडे उभा डोंगर दिसत होता. त्यावर हिरवीगार दाट झाडी असल्याने पक्ष्यांचा कलरव ऐकू येत होता. सूर्यदेवाने आपल्या किरणांनी त्या भागाला न्हावू घातले होते. त्यामुळे स्वच्छ, सुंदर, सुचीर्भूत अशा निसर्गाचे दर्शन खिडकीतूनच पहाटे पहाटे घेत, झोपेला निरोप देत, गरमागरम चहाच्या प्राशनाने ङ्ग्रेश होत आवरायला घेतले. स्नानादी आटोपून, पोटपूजा करून, पुढील दर्शनस्थळाकडे जाण्यासाठी तयार होऊन सगळे एकत्र गोळा झालो. आमच्या एकूण अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता.
पहिले स्थळदर्शन होते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात स्थित असलेले मंदिर, जे शंकराचे आहे. अनायासे सोमवार असल्याने शिवाचे दर्शन घडणार होते. बसने काचारी घाट या बोटी नांगरून ठेवलेल्या धक्क्यापर्यंत गेलो. खूप दूरवर पसरलेले ब्रह्मपुत्रेचे पात्र बरेच रुंद होते. बोटीत बसून आमचा प्रवास सुरू झाला. बोटीचे छप्पर इतके बुटके होते की जवळपास सगळ्यांनाच डोके आपटून घ्यावे लागले. प्रत्येकजण दुसर्‍याला सांगत होता. वाकून, नम्र होऊन या देवदर्शनाला जातानाच सर्वांना असे नतमस्तक व्हावे लागत होते. वीस मिनिटांच्या बोटीतल्या प्रवासानंतर बोट त्या टेकडीपाशी पोचली. या पिकॉक आयलंडवर लोक शिवाचे पूजन करण्यासाठी येतात. नदीच्या पात्रात मधोमध एका छोट्या टेकडीवर हे उमानंद महादेवाचे मंदिर आहे. मंदिराकडे जायला सत्तर पायर्‍या चढून जावे लागते. पायर्‍या सुरू होण्यापूर्वी आपलं स्वागत होतं ते एका सुंदर कमानीने. असं सांगितलं जातं की या छोट्याशा पर्वतटेकडीवर स्वतः श्री शंकर तपस्येला बसले होते तेव्हा बाकीच्या देवांच्या सांगण्यावरून कामदेवाने त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. त्या रागाने क्रोधीत झालेल्या शंकरांनी त्याला भस्मसात करून टाकले. ते या टेकडीवर घडले असल्यामुळे या जागेला ‘भस्माचलपर्वत’ असे म्हणतात. अहोम राजा गंगाधर याने हे मंदिर सोळाशे चौर्‍याणवमध्ये बांधले पण नंतर अठराशेमध्ये झालेल्या भूकंपात ते नष्ट झाले. त्याची पुनर्बांधणी एका व्यापार्‍याने केली.