इस्रायल-अमेरिकेचा इराणवर संयुक्त हल्ला
मध्य पूर्वेत प्रचंड तणावाची स्थिती
इराणचा प्रत्युत्तराचा इशारा, आखाती देशांवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिकेने काल रविवारी केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी (87) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींनीदेखील जीव गमावला आहे. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे.
अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये 200 पेक्षा अधिक जण ठार झाले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेतील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे.
इस्रायल आणि अमेरीकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये शनिवारी (28 फेब्रुवारी) इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना इराणला हादरवून टाकरणारी ठरली आहे.
इराणने त्यांच्या नव्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती केली असून अयातुल्लाह अली खामेनी यांच्या मृत्यूमुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह ज्या -ज्या देशांमध्ये अमेरिकेचे सैन्य तळ आहेत, त्या देशावर इराणने जोरदार हल्ले केले आहेत. या युद्धाचा फटका जगभरातील जवळपास सर्वच देशांना बसण्याची शक्यता आहे. युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, अनेक भारतीय नागरिक इराण आणि दुबईमध्ये अडकून पडले आहेत.
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करून म्हटले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक खामेनी मारला गेला. हा इराणच्या जनतेसाठी तसेच अमेरिका आणि जगभरातील देशांसाठी न्याय आहे.
अयातुल्ला अराफी सर्वोच्च नेते
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणी धर्मगुरू अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची अंतरिम नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणच्या संविधानानुसार आवश्यक असलेल्या नवीन नेत्याची निवड होईपर्यंत संक्रमण काळात ही परिषद सर्वोच्च नेत्याची सर्व कर्तव्ये पार पाडेल. अराफी यांनी इराणमधील आतंरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या अल-मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू पदही भूषवले आहे. ते खामेनी यांच्या जवळचे आणि विश्वासू होते. मात्र ते कट्टरपंथी विचारसरणीचे आहेत.
खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताचे सुरुवातीला इराणने खंडन केले, परंतु रविवारी सकाळी खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तासंबंधी दुजोरा दिला. खामेनी यांच्या मृत्यूनंतर संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम जगात होणार आहे. तेल आयात करणाऱ्या देशाचे आर्थिक गणितही बिघडू शकते.
मोसादकडून लक्ष
या कारवाईत लष्करी तळ, सरकारी ठिकाणे आणि वरिष्ठ नेतृत्व स्थानांना लक्ष्य करण्यात आले. ज्यात संरक्षण मंत्री अमीर नासरजादेह आणि कमांडर इन चीफ मोहम्मद पाकपूर यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. इस्रायलच्या मोसादकडून खामेनी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते होते. त्यानंतर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला होता.
गुप्त व सुरक्षित बैठकीच्यावेळी अचूक हल्ल्यात खामेनी ठार
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. हा हल्ला त्या वेळी झाला जेव्हा 86 वर्षीय खामेनी एका गुप्त आणि सुरक्षित ठिकाणी बैठक घेत होते. ते त्यांच्या दोन अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. खामेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठक घेत होते. गुप्तचर यंत्रणा बराच काळ अली शमखानी यांच्यावर नजर ठेवून होत्या. अली शमखानी हे खामेंनींना भेटण्यासाठी त्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले, त्याच वेळी संयुक्त हवाई हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत अचूक आणि वेगवान होता, तसेच ज्या ठिकाणी बैठक सुरू होती, नेमके त्याच ठिकाणाला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिका आणि इस्रायलची संयुक्त कारवाई
ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती, ज्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल दोन्ही सहभागी होते. या हल्ल्यानंतर त्या ठिकाणाला पूर्णपणे सील करण्यात आले. बचाव आणि तपास पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली. यानंतर अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे असे स्पष्ट करण्यात आले.
खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर इराणमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. अनेक सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणी अलर्ट जारी केला गेला आहे. संपूर्ण देशभर शोकाची व संतापाची लाट पसरली आहे. उच्चस्तरीय बैठका सुरू असून, पुढील राजकीय प्रक्रियेबाबत चर्चा सुरू आहे.
ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी आता इराणने थेट फतवा जारी केला आहे. इराण आता खामेंनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणमध्ये आता लाल ध्वजदेखील फडकवण्यात आला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या हत्तेसाठी फतवा जारी झाला असल्याने आता इराण प्रचंड आक्रमक धोरण स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराण चांगलाच खवळला आहे. इराणने पहिल्यांदाच अरब देश ओमानच्या बंदरावर ड्रोन हल्ले केले. त्याचप्रमाणे इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी फतवा देखील जारी केला आहे. आता अमेरिका-इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात इराणने संताप व्यक्त केला आहे.