आषाढमेघ

0
177
  • मीना समुद्र

जलसंजीवनीने परिपूर्ण असे हे मेघ जीवनबीजानं गजबजलेले असतात. मोती पिकवायला आसुसलेल्या धरणीवर ते अनवरत बरसत राहतात. आपल्या शेतीप्रधान देशात आषाढमेघांचीच प्रतीक्षा इथल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात असते…

मराठी वर्षाच्या कालगणनेप्रमाणे आज आषाढ शुद्ध प्रथमा- म्हणजेच आषाढ महिन्याच्या शुभारंभाचा हा दिवस. प्रत्येक ऋतूच्या बहराचा एक अत्युच्च काळ असतो; आषाढ हा पाऊस बहराचा काळ. एरव्हीच्या आकाशात विहरणारे पांढरेशुभ्र ढग हे कसे हलके, खेळकर, आनंदी, प्रसन्न वाटतात. निळ्यापांढर्‍या रंगात सावळीकाळी छटा मिसळून आकाशाचं आभाळ होताना हे ‘गडद निळे गडद निळे जलद’ भरून भरून येतात. कुठून-कुठून गोळा केलेली जलसंपदा ओटीपोटी साठवणारे हे मेघ मात्र गूढगंभीर वाटतात; तरीही हे नीरद, हे वारिद, हे जलद वार्‍याच्या रथावर स्वार होऊन येतात. पाणी देणारे हे मेघ सघन, सजल, सुंदर, सतेज, सजग आणि सुजाण वाटतात. काळ्यासावळ्या वर्णावर संपन्नतेचे तेज झळकत असल्याने ते अतिशय राजस, रूपस दिसतात. त्यांच्यामुळे आकाश घननीळ होते. ते मेघनाद करते. विद्युल्लतेचे उत्तरीय सावरणार्‍या विष्णूरूपाचे दर्शन घडवते. वैशाखवणवा सोसणार्‍या सृष्टीतील जीवांच्या किती हाका, किती प्रार्थना, किती विनवण्या त्याने ऐकलेल्या असतात. घनश्याम आषाढाचे दयार्द्र हृदय अधिकाधिक करुणार्द्र होत जाते आणि ओथंबून, ओठंगून दारी उभे ठाकलेले ते श्यामल रूप करुणा-दयेचा पाझर होऊन बरसू लागते. जीवाशिवाचे मीलन घडवणारे हे आषाढमेघ!
आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरी आश्रमामध्ये राहणार्‍या विरही यक्षाने पर्वतशिखराला बिलगलेला एक सावळा मेघ पाहिला. तो मेघ जणू गिरीतटाला ढुसण्या देण्यासाठी खाली वाकलेला गजराजच होता. अशा त्या सुंदर, सजल, शुभसंकेती मेघाला पाहून हा आपले काम नक्की करील, आपला संदेश प्रियेकडे नक्की पोचवेल असे त्याला वाटले. पूजा अर्घ्य देऊन त्याने त्याचा सत्कार केला. एरव्ही सुखी माणसालासुद्धा मेघ पाहून हुरहुर वाटते, प्रियजनांना भेटण्याची उत्सुकता वाटते, तर विरही, प्रियेपासून दूर एकांतवासात बंदी असलेल्या यक्षाच्या मनाची स्थिती तर अधिकच हळवी, कातर होणे हे अगदी सहज स्वाभाविक होते. त्यामुळेच मेघाच्या बाबतीत चेतन-अचेतनाचा विचार त्याच्या उतावळ्या मनाला जरासुद्धा शिवला नाही आणि त्याने त्याला आपला दूत बनवून आपला संदेश प्रियेला सांगण्यासाठी उद्युक्त केले. त्याची १२० श्‍लोकी कथा म्हणजेच कालिदासाच्या प्रतिभेला पडलेले एक सुंदर स्वप्न! कालिदासाच्या कल्पनेची उत्तुंग भरारी, त्याचे भौगोलिक ज्ञान, अत्यंत रम्य अशी सृष्टिवर्णने, सहजगत्या आलेली सुभाषिते, मनुष्यस्वभावाची उत्कृष्ट जाण, अचेतनाला सचेतनाची डूब देणारी त्याची विलक्षण हातोटी या सार्‍यांमुळे प्रतिभेचा आषाढमेघ कालिदासाच्या उरी दाटून आल्याचे जाणवते. हा मेघ नुसता दाटून आला नाही तर तो वर्षाव करतो आहे करुणेचा, नीतीचा, कल्पनांचा, भावभावनांचा. हा मेघ अंतरी गलबलून आला तो समोरच्या पर्वतशिखराला ढुसण्या देणार्‍या मेघाला पाहून. तो मेघ कालिदासाचा पर्यायाने यक्षाचा सखा-सोयरा झाला, आत्मीय मित्र, बंधू झाला आणि संदेशवहनाची कामगिरी त्याने त्याच्यावर सोपवली.

वीज चमकल्याने सोन्याच्या कसाचा दगड वाटावा असा तो मेघ कालिदासाला जणू पूर्ण उतरला तो प्रथमदर्शनीच. प्रतिभेचा विलक्षण साक्षात्कार कालिदासाने घडवला तो त्या गजराजसदृश मेघाला पाहून. आणि तो शुभमुहूर्त होता आषाढाचा पहिला दिवस. म्हणून त्याच्या अद्भुत काव्याची सुरुवात होते ती ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ या पंक्तीपासून. कालिदासाचे ‘शाकुंतल’ गटे डोक्यावर घेऊन नाचला. ‘विक्रमोर्वशीय’, ‘कुमारसंभव’ अशी नाटके, काव्येही अतिशय गाजली. आणि ‘मेघदूता’ने तर इतिहास घडवला. त्यातल्या कल्पनेने, चमत्कृतीने सर्वांनी आश्‍चर्याने तोंडात बोटे घातली. जगभर त्याचे चाहते निर्माण झाले. आषाढाचा पहिला दिवस हा ‘कालिदासदिन’ म्हणून सर्वत्र साजरा होऊ लागला. नृत्य, गायन, वादन, शिल्प, संगीत, वक्तृत्व, वाचन, चित्र अशा विविधांगी कलांचा उत्सव सर्वत्र साजरा होऊ लागला. त्याचा मुहूर्त ‘आषाढस्य प्रथम दिवस’ अर्थातच! कालिदासाची ही पंक्ती आपल्या कला-संस्कृतीची परंपरा झाली. काळेसावळे आषाढमेघ दिव्य द्युती आणि कांती लेवून आलेले. त्यांचा आवेग आणि आवेशही मोठा. आणि त्याचं गर्जीत धीरगंभीर. जलसंजीवनीने परिपूर्ण असे हे मेघ जीवनबीजानं गजबजलेले असतात. मोती पिकवायला आसुसलेल्या धरणीवर ते अनवरत बरसत राहतात. आपल्या शेतीप्रधान देशात आषाढमेघांचीच प्रतीक्षा इथल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात असते. काळेसावळे आषाढमेघ समृद्धीचे प्रतीक म्हणून शुभलक्षणी मानले जातात. सोन्यामोत्याच्या संसाराची स्वप्ने त्यांच्यामुळेच साकार होणार असतात. कालिदासाचे मन त्याच जातीचे. याच संस्कारात घडलेले. निसर्गपुत्रच तो. त्यामुळे मेघाशी त्याचे चटकन नाते जुळते. म्हणून तो आषाढमेघ त्याला परका वाटतच नाही. तो त्याचा आप्त-स्वजन आहे, त्याची व्याकूळ भावना समजून-उमजून घेईल असा तो सुजन आहे.

कालिदासाच्या काव्यप्रतिभेची हीच तर खरी मेख आहे की तो निसर्गावर मानवी भावभावनांचं आरोपण करतो; त्याच्या काव्यात, नाटकांत निसर्गाचे मानवीकरण आहे. अचेतनाला चेतनेचा स्पर्श आहे, उत्कृष्ट भावभावनांचा साक्षात्कार आहे, आशेचा आविष्कार आहे, आनंदाचा ॐकार आहे आणि शांततेचा पुरस्कार आहे. चैतन्यशील सृष्टी त्याच्या चित्ताला चिंतनाची प्रेरणा देते आणि चंद्रकिरण पडल्यावर चंद्रमणी पाझरावा तसा त्याच्या प्रतिभेला पाझर फुटतो. धूर, अग्नी, उदक, वायू यांनी बनलेला काळाकाळा आषाढमेघ हा जलवर्षाव करणारा म्हणून तो दयाळू, करुणामय, पोळलेल्या जीवांची व्यथा जाणणारा त्यांचा आसरा वाटतो, तसाच स्वतःचा आधारही! राजहंस, बलाकांची सोबत त्याला आहे. बलाका त्याच्या सहवासातून गर्भिणी होतात. मेघ पर्वतमित्राला भेटून आलिंगन देतो, अश्रू ढाळतो. मार्गातल्या नद्यांचं पाणी पिऊन तरतरीत होतो. प्रवासाचा शीण घालवतो. त्याच्या घनगंभीर गर्जनांनी फुले फुलतात, मोर नाचतात; केकांनी त्याचे स्वागत करतात. कुठे तो गर्जितांनी स्त्रियांना विस्मित करतो, कुठे वीज चमकवून वणवा विझवण्याचे काम करतो- हे चित्र ‘मेघदूता’ने आपल्यासमोर साक्षात होते. दूत हा सेवातत्पर, चटपटीत, चतुर, हुशार, सतर्क, सावधान, दक्ष, विनम्र, प्रामाणिक असावा लागतो. कालिदासाचा आषाढमेघ हा कृपाघन, दयाघन असल्याने तो आपला संदेश पोचविण्याचे काम नक्कीच करेल अशी खात्री कालिदासाच्या यक्षाला वाटते आणि हा विरही यक्ष मेघाची बिजलीपासून ताटातूट न होवो अशी इच्छा व्यक्त करतो. आषाढमेघासारखीच कालिदासाची उदारमनस्कता अंतःकरण हेलावून सोडते.