मूळ गोव्यातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (७९) यांचे काल सातारा येथील एका इस्पितळात कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणासाठी आशालता ह्या सातारा येथे आल्या होत्या. या मालिकेत त्या महत्त्वाची भूमिका साकारत होत्या. मात्र तेथे सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली. गेले ५ दिवस त्या सातार्यातील एका इस्पितळातील कोविड अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर कोविड न्युमोनियामुळे मंगळवारी पहाटे चारच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. अभिनेत्री अलका कुबल यांनी आशालता यांना मुखाग्नी दिला.
आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत अभिनेत्री अलका कुबल होत्या. या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरात सुरू होते. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या सेटवर मुंबईहून एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी एक गट आला होता. यातील काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता होती. यानंतर २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे नंतर या मालिकेचे चित्रीकरण बंद करण्यात आले. यावेळी आशालता यांनाही अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल केले होते.
आशालतांच्या निधनाने दुःख ः कामत
कलेची सेवा करतानाच आशालता यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ गोमंतकीय अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या अचानक निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांनी अभिनय व संगीत क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले व प्रामाणिकपणे कला सेवा केली. कलेच्या सेवेचे कर्तव्य बजावतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी श्रद्धांजली विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी वाहिली.