आपला विजय निश्‍चित : पर्रीकर

0
114

पणजी पोटनिवडणुकीनिमित्त संपूर्ण पणजी शहराचा कोपरान कोपरा आपण फिरलो व पुढील पाच वर्षांसाठीची कृती योजना मतदारसंघातील जनतेपुढे ठेवली असून आपला विजय निश्‍चित असल्याचे मुख्यमंत्री व भाजपचे पणजीतील उमेदवार मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मतदारसंघातील कार्यकर्ते व हितचिंतक यांनी गेले काही दिवस आहोरात्र आपणासाठी प्रचार केला. पक्षाचे आमदार, मंत्री व घटक पक्षातील आमदार आणि मंत्री यांनीही प्रचारात भाग घेऊन आपला विजय व्हावा यासाठी हातभार लावल्याचे ते म्हणाले. चतुर्थी तोंडावर असताना ही निवडणूक होत असली तरी मतदान कमी होणार नाही, असा विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या दरम्यान आपण एकूण १२० छोट्या बैठका घेतल्या. त्याद्वारे आपणाला मतदारसंघातील ४ हजार कुटुंबांपर्यंत पोचता आल्याचे ते म्हणाले. या लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या भागातील समस्या समजून घेतल्या. या समस्या आपण लक्षात ठेवलेल्या असून निवडणुकीनंतर त्या दूर करण्यासाठी काम करणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
कचरा समस्या सोडवणार
पणजी शहराला भेडसावणारी एखादी महत्त्वाची समस्या कोणती व त्यावर कसा तोडगा काढणार, असे विचारले असता पणजीत कचरा समस्या सोडवण्याची गरज आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पर्रीकर म्हणाले. त्यासाठी नाबार्डची मदत घेण्यात येणार असून वर्ष – दीड वर्षात प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. वाहतुकीची होणारी कोंडी ही आणखी एक समस्या आहे असे सांगून वाहनांची संख्या वाढतच चालल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यावरही तोडगा काढला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पणजी व वाळपईतील मतदारांना सुटी
पणजी व वाळपई अशा दोन मतदारसंघात ही पोटनिवडणुक होत असून या दोन्ही मतदारसंघातील मतदार असलेल्या नोकरदारांना २३ रोजी भरपगारी सुटी मिळणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. जी खाजगी आस्थापने सुटी देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.