पर्रीकरांना धडा शिकवा : कॉंग्रेस

0
96

कॉंग्रेसने पणजी पोटनिवडणुकीसाठी दमदार, युवा व निष्कलंक असा उमेदवार लोकांपुढे ठेवलेला असून बहुमत नसताना गैरमार्गाने सत्तेवर आलेल्या मनोहर पर्रीकर यांचा मतदारानी पराभव करण्याची गरज आहे, असे कॉंग्रेस प्रवक्ते व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ऍड. रमाकांत खलप यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
देशप्रेमाच्या गोष्टी करणार्‍या भाजप नेत्यांना गैरमार्गाने सत्ता बळकावणे शोभत नसल्याचेही खलप यावेळी म्हणाले. भारताची लोकशाही व वारसा याचा भाजप नेत्यांनी आदर करावा, असेही ते म्हणाले. पणजीचे लोक हे हुशार व उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे ते कॉंग्रेसच्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मते देऊन विजयी करतील, असा विश्वासही यावेळी खलप यांनी व्यक्त केला. मतदारानी न घाबरता मतदान करावे व स्वत:ची दिशाभूल होऊ देऊ नये, असे आवाहनही खलप यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, महिला कॉंग्रेसने पणजीत जोरदार प्रचार केलेला असून कॉंग्रेसचा विजय होईल असा दावा त्यांनी केला. चतुर्थीच्या तोंडावर राज्यात टॉमेटोचे दर गगनाला भिडलेले असून महागाई आटोक्यात आणण्यात भाजपला अपयश आल्याची टीका कुतिन्हो यांनी केली.
दरम्यान, तुमची सद्सद्विवेक बुध्दी ज्या व्यक्तीला तुम्हांला मतदान करायला सांगेल त्यांना करा, असे पणजी पोटनिवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी सांगितले. निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे देणारे उमेदवार खूप असतात पण मतदारांनीच आपणाला पैसे नकोत असे सांगितले. माझ्याकडे पैसे नाहीत हे त्यांना माहीत असल्याचे चोडणकर म्हणाले.