आपतर्फे घरोघरी ऑक्सिजन तपासणी ः गोम्स

0
129

आम आदमी पक्षातर्फे राज्यातील वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गोवन अगेन्स्ट कोरोनाअंतर्गत घरोघरी जाऊन ऑक्सिजन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आपचे राज्य निमंत्रक एल्विस गोम्स यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

आपचे प्रशिक्षक स्वयंसेवक घरोघरी जाऊन ऑक्सिमीटरच्या साहाय्याने नागरिकांची ऑक्सिजनची तपासणी करणार आहेत. या मोहिमेत तपासणीसाठी कुणावरही दबाव आणला जाणार नाही. नागरिक स्वेच्छेने तपासणी करून घेऊ शकतात. या मोहिमेत ऑक्सिजनची पातळी कमी आढळून येणार्‍या नागरिकांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही गोम्स यांनी सांगितले.

राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्यानंतर तपासणी नाक्यावरील कोविड चाचणी बंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपने राज्यातील काही भागात ऑक्सिमीटरच्या साहाय्याने नागरिकांचा ऑक्सिजन तपासणीची मोहीम राबविली आहे. त्या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभल्याचे गोम्स म्हणाले.

गोवा सरकारला कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात यश प्राप्त झालेले नाही. राज्य सरकारच्या कोरोना नियंत्रणाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. राज्यातील कोविड रुग्णाचे होम आयसोलेशन, कोविड केअर सेंटरमधील कारभार, कोविड इस्पितळातील कारभार, रुग्णांना मिळणारी आरोग्य सेवा आणि राज्यातील व्हीआयपी लोकांकडून घेतली जाणारी खासगी इस्पितळातील उपचाराच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ऑक्सिजन मोहिमेतून नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याचे गोम्स यांनी सांगितले.

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. नवी दिल्ली येथे प्लाझ्मा थेरपीचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आपच्या गोवा शाखेकडून गोव्यातील नागरिकांना कोरोना विषाणूबाबत सावध केले जाणार आहे. ही मोहीम राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून हाती आलेली नाही, असेही गोम्स यांनी स्पष्ट केले. या मोहिमेसाठी ४०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कोविड नियमांचे पूर्ण पालन करून ही मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांचा ऑक्सिजन तपासणी करण्यापूर्वी सॅनिटायझेशन केले जाणार आहे, असे राहुल म्हांबरे यांनी सांगितले. यावेळी सुरेल तिळवे, सुनील सिग्नापूरकर उपस्थित होते.