‘आप’कडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी

0
83

>> चाळीसही मतदारसंघात लढणार

 

आम आदमी पक्षाने चाळीसही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले असून ही प्राथमिक स्तरावरील यादी तयार करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे निमंत्रक वाल्मिकी नाईक यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ही यादी तयार करण्यासाठी सध्या कार्यकर्ते सर्व मतदारसंघांचा दौरा करीत आहेत. प्रत्येक मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिकांची त्यासाठी मदत घेण्यात येत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. सर्व चाळीसही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नावे पक्षाच्या निवड समितीकडे सोपवण्यात येतील. मग ही निवड समिती या याद्यांमधून चाळीस मतदारसंघासाठीच्या चाळीस उमेदवारांची निवड करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आम आदमी पक्षाने यापूर्वीच राज्यातील सुमारे ३५ मतदारसंघांत जोरदार प्रचार सुरू आहे. पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण केलेला असून आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यात पक्षाचे नेते व नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा पणजीत २२ मे रोजी घडवून आणण्यात आली होती.
२०-२१ रोजी केजरीवाल गोव्यात
आता दुसर्‍या टप्प्यात २०-२१ रोजी केजरीवाल गोवा दौर्‍यावर येत असून यावेळी खाण अवलंबित व महिला वर्गाशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना ऐकून घेणार आहेत.
खाण विस्थापितांशी संवाद
दरम्यान, राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने जे लोक विस्थापित झाले त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी अरविंद केजरीवाल हे खाणपट्ट्यात जाणार आहेत. यावेळी ते या लोकांच्या समस्या ऐकून घेण्याबरोबरच त्यांना सरकारकडून नेमके काय अपेक्षित आहे हे जाणून घेणार आहेत. तसेच ते यावेळी राज्यातील महिला वर्गाशी संवाद साधणार असून सदर कार्यक्रम मडगाव शहरात होणार आहे.