लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

0
100

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात प्रवेश दिला जावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार असल्याचे काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.

राज्यातील संचारबंदी हटवण्यात आल्यानंतर पर्यटन उद्योग सुरू करावा लागणार असल्याचे लोबो म्हणाले. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न असल्याने बंद असलेली हॉटेल्स, रेस्टॉरन्टस् सुरू करावी लागणार आहेत. त्यामुळे कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांनाच राज्यात प्रवेश दिला जावा. तसेच ज्यांनी डोस घेतलेले नाहीत त्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले जावे, अस आपणाला वाटत असून तशी मागणी आपण मुख्यमंंत्र्यांकडे करणार असल्याचे लोबो म्हणाले.

बेफिकिरी नको ः लोबो

गोव्यामध्ये सध्या काही प्रमाणात कोरोना विषाणूच्या फैलावाचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच मृत्यूसंख्याही खालावलेली असली तरी नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगताना अजिबात बेफिकीर राहता कामा नये. येत्या एक दोन महिन्यांत पूर्वीप्रमाणे सर्व व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी लोकांनीही सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी यावेळी केले.