आज मुंबई बंदची हाक

0
95

>> मराठा आरक्षण आंदोलन पेटले

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मुंबई, नवी मुंबई व ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद दरम्यान तोडफोड आणि हिंसा करू नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे. आंदोलनादरम्यान आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे.

दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात काल दुपारी मराठा मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर या भागांमध्ये बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला. विरेंद्र पवार, मुंबई समन्वयक यांनी ही घोषणा केली.

बंदची हाक देण्यात आली असली तरी आज शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवा आणि दूध विक्रेत्यांनाही बंदतून वगळण्यात आले आहे. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. सरकारने तातडीने मेगा भरती थांबवावी अशी मागणीही झाली.
दरम्यान, नवी मुंबई आणि पनवेलमध्येहीही आज बंद पाळण्यात येईल. वाशीमधील माथाडी भवनात सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत.