खाणबंदी ः विधानसभेत ठराव मांडणार

0
87

>> मुख्यमंत्र्यांचे मायनिंग पीपल फ्रंटला आश्‍वासन

>> केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार

राज्यातील खाण बंदी प्रश्‍नावर विधानसभेत ठराव आणि केंद्रातील मंत्रिमंडळ गटाच्या समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा मायनिंग पीपल ङ्ग्रंटच्या शिष्टमंडळाला काल दिले. जीएमपीएङ्गच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पर्रीकर यांची पर्वरी येथे विधानसभा संकुलात काल संध्याकाळी भेट घेतली. यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत व आमदार नीलेश काब्राल यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर राज्य विधानसभेत ठराव मांडून योग्य चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गट समितीला खाण प्रश्‍नी प्रस्ताव सादर करणार आहेत, अशी माहिती जीएमपीएफचे निमंत्रक पुती गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कायद्यात दुरुस्तीची गरज
राज्य विधानसभेत गोवा, दमण आणि दीव मायनिंग रेग्युलेशन ऍक्ट १९८७ मध्ये दुरुस्ती करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. वरील कायद्यात दुरुस्ती केल्यास खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यास सोपे होणार आहे. यासंबंधीचा ठराव राज्य विधानसभेत संमत करण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री गटासमोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती जीएमपीएङ्गचे निमंत्रक गावकर यांनी दिली.

कॉंग्रेसचा पाठिंबा आवश्यक
केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केल्यास त्याला कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी नजरेस आणून दिले.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची यापूर्वीच भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे. त्यांनी खाण बंदीच्या प्रश्‍नी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास जीएमपीएफच्या शिष्टमंडळाने आणून दिले, असेही गावकर यांनी सांगितले.

आजचे धरणे आंदोलन रद्द
जीएमपीएङ्गकडून खाण बंदीच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. केंद्रीय खाण मंत्र्यांना खाण बंदीच्या प्रकरणी निवेदन सादर करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खाण बंदीच्या प्रश्‍नात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिल्याने बुधवार २५ जुलै रोजीचा धरणे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असेही गावकर यांनी सांगितले.