अद्ययावत आरोग्य सुविधांवर भर : आरोग्यमंत्री

0
145

राज्यात अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्ण आणि इतरांना दर्जेदार अन्नाचा पुरवठा केला जाणार आहे. मधुमेही रुग्णांसाठी प्राथमिक व सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विधानसभेत आरोग्य व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना काल दिली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले जात आहे. हृदयरोग विभाग सक्षम करण्यात आला आहे. कार्डीयाक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्राथमिक आणि सामाजिक आरोग्य केंद्रांतील ४० डॉक्टरांना हृदयरूग्णांना प्राथमिक स्तरावर योग्य उपचार देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. डायलिसीससाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

आरोग्य खात्याने २६ नवीन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण व सामाजिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्याची योजना आखण्यात आली आहे. रक्त तपासणीसाठी नवीन पद्धतीचा वापर केला जात आहे. रक्ततपासणी सुविधा लोकांच्या दारापर्यंत पोचविण्यात आली आहे. रुग्णांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात आहे. गोमेकॉतील डॉक्टरांना विदेशात प्रशिक्षणाची संधी दिली जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

ङ्गोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरली जाणार असून हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. मधुमेहींची रजिस्ट्री सुरू करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचे साहाय्य घेतले जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मडगाव येथील नवीन जिल्हा इस्पितळाच्या कामाला चालना देण्यात आली आहे. जुन्या हॉस्पिसियोच्या समस्यांकडे लक्ष दिले जात आहे. या इस्पितळाचे योग्य नियोजन करून प्रत्येक विभाग सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.