आजपासून विद्यालये गजबजणार

0
5

>> नवीन शैक्षणिक वर्षास आज प्रारंभ

उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 ला सोमवार 5 जून 2023 पासून प्रारंभ होत आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित विद्यालये पुन्हा मुलांनी गजबजणार आहेत. तथापि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पायाभूत स्तरावरील वर्गांचा येत्या 3 जुलै 2023 पासून प्रारंभ केला जाणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने पालक आणि मुलांकडून गणवेश, वह्या, रेनकोट, छत्री व इतर शैक्षणिक साहित्याची खरेदी केली जात आहे. या वर्षी वह्या व इतर साहित्यांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विद्यालयातून पुस्तके उपलब्ध केली जात आहेत.

शैक्षणिक वर्ष वेळेत
राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात काही दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता पालक वर्गाकडून व्यक्त केली जात होते. तथापि, राज्य सरकारने शैक्षणिक वर्ष नियोजित वेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक कोंडी करू नका
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी येतात. त्यामुळे राज्यातील काही भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. कुजिरा बांबोळी येथे अनेक विद्यालये कार्यरत आहेत. याठिकाणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
पालक वर्गाने वाहतूक नियमांचे योग्य पालन करावे. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.