प्रश्न रेल्वे सुरक्षेचा

0
7

उडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळील भीषण तिहेरी रेलदुर्घटना ह्रदयाचा थरकाप उडवणारी तर आहेच, पण रेल्वे सुरक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला पुन्हा एकवार ऐरणीवर आणणारीही आहे. गेल्या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वदेशी बनावटीची कवच नामक रेल्वे अपघातरोधक सुरक्षा यंत्रणा देशभरात बसवण्यात येणार असल्याची घोषणा करून टाळ्या मिळवल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात हे कवच या अपघातातील दोन्ही प्रवासी रेलगाड्यांना बसवलेले नव्हते हेही या दुर्घटनेतून स्पष्ट झाले आहे. हा अपघात नेमका कसा घडला, चूक नेमकी कोणाकडून घडली, स्वयंचलित यंत्रणेत बिघाड झाला की ही मानवी चूक आहे यासंदर्भात अद्याप स्पष्टता नाही. रेल्वेने घोषित केलेल्या चौकशीतून त्याबाबतची वस्तुस्थिती समोर येईल अशी अपेक्षा आहे, परंतु कुठे ना कुठे तरी मोठी गंभीर चूक निश्चितपणे घडली आहे असे आतापावेतो उपलब्ध असलेल्या माहितीवरून तरी दिसते. शालीमार – चेन्नई कोरोमांडेल एक्सप्रेस या स्थानकापाशी येताच रूळावरून कशी घसरली हा या दुर्घटनेसंदर्भातील मूलभूत प्रश्न आहे. ती मुख्य लोहमार्गावरून बाजूच्या लूपवर जाऊन तेथे उभ्या करण्यात आलेल्या मालगाडीला धडकल्याने ही दुर्घटना घडली असे सध्या मानले जात आहे. मालगाडीला धडकताच तिचे इंजीन मालगाडीवर चढले आणि डबे इतस्ततः फेकले गेले. यापैकी काही डबे बाजूच्या डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर (बेंगळुरू) – हावडा एक्स्प्रेसच्या शेवटच्या काही डब्यांना धडकले. मुळात कोरोमांडेल एक्स्प्रेस रूळावरून कशी घसरली किंवा ती मालगाडीला कशी धडकली? एकाचवेळी गाड्या धावत असतात तेव्हा त्यांना बाजू देण्यासाठी काही स्थानकांवर लूप म्हणजे जादा लोहमार्ग ठेवलेला असतो. प्रवासी रेलगाड्यांना बाजू देण्यासाठी सहसा मालगाड्या बाजूला काढल्या जातात. बहनगा बाजार स्थानकावर दोन्ही प्रवासी एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नव्हता, त्यामुळे तेथील सहायक स्टेशन मास्तरने मालगाडी बाजूच्या लूपवर काढली. परंतु मागून आलेली कोरोमांडेल एक्स्प्रेस त्या लूप मार्गावर जाईपर्यंत त्याचे मुख खुले कसे राहिले हा या दुर्घटनेसंदर्भातील महत्त्वाचा प्रश्न. हा मार्गबदल रेल्वेच्या रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टमद्वारे होत असतो. या यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली का की तिला सहायक स्टेशन मास्तरने चुकीचा सिग्नल दिला असा प्रश्न आता विचारला जात आहे. अर्थात यंत्रणेत बिघाड झाला असता, तर सिग्नल स्वयंचलितपणे लाल झाला असता. त्यामुळे याबाबत नेमके काय घडले ते चौकशीतच समोर येऊ शकेल. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या मोकळे सोडले जाणार नाही असा इशारा स्वतः पंतप्रधानांनी दिला आहे, त्यामुळे यासंदर्भात कारवाई जरूर होईल, परंतु त्यामुळे निरपराध्यांचे गेलेले प्राण काही परत येणार नाहीत. जखमींनी गमावलेले हात पाय काही परत मिळणार नाहीत. या दुर्घटनेत मुख्यतः खचाखच भरलेले जनरल डबे छिन्नविच्छिन्न झाले. गोरगरीब मजूर लोक या जनरल डब्यातून दाटीवाटीने प्रवास करीत असतात. त्यामुळेच प्राणहानीचा आकडा अधिक आहे.
या दुर्घटनेसंदर्भातील एक संस्मरणीय बाब म्हणजे अपघात होताच स्थानिक इस्पितळांत रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने अक्षरशः रांगा लावल्या. गर्दीमुळे रक्तदात्यांना परत जाण्यास सांगावे लागले, पण ते दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन रांगेत उभे राहिले. उडिसावासीयांनी दाखवलेली ही माणुसकी खरोखर कौतुकास्पद आहे. दुर्घटनेचे मदतकार्यही वेगवान होते. रेल्वे, स्थानिक सुरक्षा दले, एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांनी समन्वयाने हाती घेतलेले मदतकार्य दीड दिवसात आटोपले. ही तत्परताही प्रशंसनीय आहे. आता या दुर्घटनेची चौकशी आणि अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठीच्या उपाययोजना यांची प्रतीक्षा आहे. दहाव्या लोकसभेपासून सतराव्या लोकसभेपर्यंतच्या काळात म्हणजे 1993 ते 2023 पर्यंत 119 रेल्वे दुर्घटना घडल्या. कोरोमांडेल एक्स्प्रेसचेच अपघात तीनवेळा घडले. या काळात रेल्वे सुरक्षेसंदर्भात तब्बल 28 सांसदीय समित्यांनी आपले अहवाल दिलेले आहेत. अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा 2012 सालचा अहवाल तर विस्तृत आहे. नुसत्या नव्या रेलगाड्या सुरू करू नका, रेलमार्ग वाढवा असे त्यांचे सांगणे होते. त्यानंतरच्या काळात सुरक्षेसंदर्भात अनेक घोषणा झाल्या. कोकण रेल्वेमधील अपघातरोधी यंत्रणेच्या धर्तीवर ऑटो ट्रेन प्रोटेक्शन अँड वॉर्निंग म्हणजेच एटीपी यंत्रणेचाही गाजावाजा झाला. नुकत्याच झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिरात विद्यमान रेल्वेमंत्र्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. पण या दुर्घटनेने रेल्वे सुरक्षेचा फुगा पुन्हा फोडला आहे. नुसत्या फुशारक्या मारण्यापेक्षा प्रत्यक्षात खूप काही करायचे बाकी आहे याचेच स्मरण या दुर्घटनेने करून दिले आहे.