ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन

0
8

पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (94) यांचे काल रविवारी 4 जून रोजी निधन झाले. दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गाने आजारी होत्या. काल उपचारांदरम्यान सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पद्मश्री, जीवनगौरव पुरस्कार
सुलोचना दीदी यांना त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव तर 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झालेल्या सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली. या काळात सासुरवास, वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली.

हिंदी चित्रपटातही छाप
सुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटातही काम केले असून अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली होती.