आकाश चोप्राची मुंबईला पसंती

0
181

आयपीएलच्या १४ व्या मोसमातील रणसंग्राम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंनी मोसमातील संभाव्य विजेत्याबद्दल भाकिते करणे सुरू केले असून भारताचा माजी कसोटी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा याने मुंबई इंडियन्स ही स्पर्धेतील धोकादायक टीम असल्याचे सांगत तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.
एका चाहत्याच्या प्रश्नाला यूट्यूबवर उत्तर देताना आकाश चोप्राने मुंबई इंडियन्स हा या मोसमातील सगळ्यात धोकादायक आणि करंडकाचा प्रबळ दावेदार असलेला संघ असल्याचे सांगितले. मुंबईजवळ रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार, पंड्या बंधू असे एकाहून एक स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईला रोखणे प्रतिस्पर्धी संघासाठी अवघड जाणार आहे, असे आकाश चोप्राने सांगितले.

मुंबई इंडियन्स हा एक संतुलित संघ आहे. ज्या संघांमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांचे उत्तम मिश्रण आहे तसेच संतुलन देखील आहे. मुंबईजवळ रोहित-क्विंटन सारखे आक्रमक सलामीवीर आहेत. तसेच डी कॉकला पर्याय म्हणून ईशान किशन सारखा युवा भारतीय फलंदाज आहे. तसेच ख्रिस लिनसारखा पर्यायी सलामीवीरही आहे. यंदाच्या मोसमात मुंबई धावांचा डोंगर रचेल. हा डोंगर पोखरु न देण्याचे काम मुंबईचे गोलंदाज करतील, असेही आकाश चोप्रा म्हणाला.