आकाशवाणीची ‘विविध भारती’ आजपासून एफ. एम. वर

0
128

>> गोव्यात आज शुभारंभ

>> १०१.१ ध्वनीलहरींवर ऐकता येणार

आकाशवाणीच्या ‘विविध भारती’ सेवेने आजवर देशभरातील खेड्यापाड्यांतील कोट्यवधी श्रोत्यांना हिंदी सिनेसंगीताची अविरत अवीट मेजवानी दिली. दूरचित्रवाणीचे आगमन व्हायच्या आधी तर ‘विविध भारती’ हे खेड्यापाड्यांतील जनतेसाठी मोठे आकर्षण होते. श्रोत्यांचे फर्माइशी कार्यक्रम, त्यांना देशाच्या कानाकोपर्‍यातून येणारी श्रोत्यांची पत्रे, त्या श्रोत्यांशी आकाशवाणीच्या निवेदकांनी जोडलेले नाते या सार्‍याचा अनुभव मागील पिढीने नक्कीच घेतला आहे. मात्र, नव्या पिढीला टीव्ही आणि इंटरनेटने मोहिनी घातल्याने रेडिओ ऐकणे कमी होत गेले. त्यावर मात करण्यासाठी आकाशवाणीने एफ. एम. सेवा सुरू करून श्रोत्यांच्या नव्या पिढ्यांना आकृष्ट करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याला बर्‍यापैकी यशही मिळत गेले. या यशापासून प्रेरणा घेऊन आकाशवाणीने आता आपली विविधभारती सेवा मिडियम वेव्हज्‌बरोबरच एफ. एम. वरही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील श्रोत्यांना आज संध्याकाळपासून एफ. एम. वर १०१.१ या ध्वनीलहरींवर ‘विविध भारती’ सेवेचा लाभ घेता येईल. अर्थात, मीडियम वेव्हवरील विविध भारतीची सेवा यापुढेही सुरू राहील अशी माहिती आकाशवाणीच्या पणजी केंद्राचे सहायक निर्देशक सिद्धार्थ मेश्राम यांनी ‘नवप्रभा’ ला दिली. वृत्तविभागाचे प्रमुख सैकत सरकार हेही यावेळी उपस्थित होते. गोव्यासाठी विविध भारतीच्या एफ. एम. सेवेचा शुभारंभ आकाशवाणीचे महासंचालक एफ. शहरयार यांच्या हस्ते आज संध्याकाळी सहा वाजता मॅकनिज पॅलेसमधील एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यासाठी आकाशवाणीने नव्या १० व्हॅट ट्रान्समिटरची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमावेळी गोव्याचे पारंपरिक गोफ नृत्य तसेच ओंकार मेलडीज या प्रसिद्ध गोमंतकीय वाद्यवृंदाच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.