हैदराबाद, आंध्रमधील मासळी फॉर्मेलिनयुक्त; खाणे टाळावे

0
117

>> चर्चिल आलेमाव यांचा पत्रकार परिषदेत दावा

हैदराबाद, आंध्र प्रदेश येथून येणार्‍या मासळीवर फॉर्मेलिन रसायन शिंपडले जात असल्याने गोव्यातील मच्छीमारी बंदीच्या काळात लोकांनी वरील राज्यांमधून येणारी मासळी खाऊ नये असे आवाहन आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

आंध्र प्रदेश, हैदराबाद व अन्य दूर प्रांतांमधून निर्यात केल्या जाणार्‍या मासळीवर ती अनेक तास ताजी राहण्यासाठी फॉर्मेलिनचे पाणी शिंपडले जाते. तेथे बर्फाचा प्लांट नसतो, त्यामुळे असे केले जाते असा दावा आलेमाव यांनी केला. फॉर्मेलिनचा अंश शरीरात गेल्यास कर्करोग होत असल्याने मच्छीमारी बंदीच्या काळात ही आयात मासळी खाऊ नये असे ते म्हणाले. गोव्यातील सीमेवरील तपासणी नाक्यांवर आयात मासळीची योग्य तपासणी होत नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, गोवा माईल्स टॅक्सी चालकांना बॅच नाही व पंधरा वर्षाचा रहिवाशी दाखल्याचे बंधन नसल्याने परप्रांतियांचा भरणा जास्ती आहे. गोवा पर्यटक टॅक्सीवाले गोमंतकीय आहेत. गोवा, गोंयकारपण शाबूत ठेवायचे असेल तर गोमंतकीय सुपुत्रांच्या हातातील हा व्यवसाय काढून घेता कामा नये. तसे केल्यास गोवा नष्ट होईल असे आलेमाव यांनी सांगितले.

गोवा माईल्समुळे गोवा सरकारला ३०० कोटी रु. कराच्या रुपाने महसूल मिळतो असे ते सांगतात. परप्रांतियाकडून एवढा महसूल मिळत असेल तर गोवा सरकारने गोवा विकून टाकावा. त्यामुळे उत्पन्न मिळत राहील. पोर्तुगीज काळापासून टॅक्सी व्यवसाय गोमंतकीय चालवित आहेत. तसेच कोकणी भाषा आम्ही सांभाळून ठेवली. गोव्यातील ४० ही आमदारांना गोमंतकीय मतदारांनी निवडून दिलेले आहे याची आठवण ठेवावी, असे आलेमाव यांनी सांगितले.